FAKE NEWS: नरेंद्र मोदी यांचा बालपणी योग करतानाचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

False राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यासोबत दावा केला जात आहे की, नरेंद्र मोदी बालपणी व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. या व्हिडिओमध्ये दिसणारे व्यक्ती नरेंद्र मोदी नसून, प्रसिद्ध योगाचार्य बी. के. एस अय्यंगार आहेत.

काय आहे दावा?

सोशल मीडियावरील ब्लँक अँड व्हाईट व्हिडिओ क्लिपमध्ये एका व्यक्ती विविध योगासनांचे प्रात्याक्षिक करून दाखवत आहे.  सोबत दावा केला जात आहे की, “आपले सर्वांचे आवडते आणि प्रिय श्री मोदी जिंचा लहान पणी योगा अभ्यास करीत असतांना चे चित्र.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ खरंच नरेंद्र मोदी यांचा आहे का हे तापसण्यासाठी त्यातील की-फ्रेम्स निवडूम रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून युट्यूबवरील विविध व्हिडिओ समोर आले. पैकी सर्वात जुना व्हिडिओ 2006 साली अपलोड केलेला आढळला.

शीर्षकानुसार, हा व्हिडिओ योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांचा आहे. 1938 साली अय्यंगार यांच्या प्रात्याक्षिकांचा मूकपट (सायलेंट फिल्म) तयार करण्या आला होता. 

बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराज (बी. के. एस.) अय्यंगार यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी कर्नाटकातील बेल्लूर येथे झाला होता. जगभरात योगाचा प्रसार व प्रचार करण्याचे त्यांनी काम केले. त्यांनी 1975 साली पत्नीच्या नावाने ‘रमामणी अय्यंगार स्मरणार्थ योग संस्था’ स्थापन केली. (लोकसत्ता)

योगप्रसार व शिकवणुकीसाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री (1991), पद्मभूषण (2002) आणि पद्मविभूषण (2014) पुरस्काराने सन्मानित केले होते. एवढेच नाही तर ‘टाइम्स’ मासिकाच्या जगातील 100 सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये अय्यंगार यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांचे 2014 साली निधन झाले. (लोकसत्ता)

अय्यंगारा यांच्या 1938 सालच्या मूकपटाचा 45 मिनिटांचा व्हिडिओ युट्यूबवर आढळला. 

अधिक शोध घेतला असता लंडनस्थित अय्यंगार संस्थेच्या वेबसाईटवर हा मूकपट डीव्हीडी स्वरुपात विक्रीस उपलब्ध असल्याचे सापडले. ‘बी. के. एस. अय्यंगार: 1938 प्रॅक्टिस’ असे या मूकपटाचे नाव आहे. डीव्हीडीच्या कव्हरवरील माहितीनुसार, हा मूकपट सुमारे 1 तासांचा आहे. 1938 साली तो चित्रित करण्यात आला होता. यातील काही भाग कृष्णधवल तर काही रंगीत आहे.

मूळ वेबसाईट – IYMY

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सदरील व्हायरल व्हिडिओ नरेंद्र मोदींचा नसून, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा आहे. नरेंद्र मोदी यांचा जन्म 1950 साली झाला होता. हा व्हिडिओ 1938 साली चित्रित करण्यात आला होता. त्यामुळे सोशल मीडियावर केला जाणारा दवा असत्य आहे.

Avatar

Title:नरेंद्र मोदी यांचा बालपणी योग करतानाचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False