आजीबाई आणि माकडाचा तो व्हायरल व्हिडिओ कोकणातील नाही; वाचा सत्य

False सामाजिक

सोशल मीडियावर सध्या आजीबाईला प्रेमाने मिठी मारणाऱ्या एका माकडाचा व्हिडिओ प्रचंड गाजत आहे. सोबत दावा केला जात आहे की, कोकणातील जामसंडे वळकूवाडी गावातील या आजीबाई आजारी असल्यामुळे हे माकड त्यांच्या काळजीपोटी भेटायला आले होते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ कोकणातील नाही. तो व्हिडिओ राजस्थानमधील आहे. 

काय आहे दावा?

30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दिसते की, पलंगावर झोपलेल्या आजीबाईपाशी एक माकड बसलेले आहे. माकड त्यांना मिठी मारते, त्याच्या पोटावर बसून चेहऱ्यावर हात फिरवते. बाजूला एक महिला हात जोडून उभी आहे. 

या व्हिडिओसोबतच्या मेसेजमध्ये म्हटले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका, जामसंडे (वळकूवाडीतील) श्रीमती. भडसाळे आजी रोज एका माकडाला खायला द्यायची आजी मध्येच आजारी पडल्याने ती २/३घरा बाहेर आली नाही म्हणून चक्क माकडच आजी बघायला घरात आले. खरंच  मुक्या प्राण्यांकडून शिकण्यासारख आहे…!!”

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडिओ बारकाईने पाहिला असता सदरील महिलांचा पेहराव महाराष्ट्रातील वाटत नाही. यावरून व्हिडिओच्या ठिकाणाची खात्री करून घेणे आवश्यक आहे. 

कीवर्ड्सच्या सहाय्याने शोध घेतल्यावर इंडिया डॉट कॉम वेबसाईटच्या ट्विटर हँडलवर 23 जून रोजी सदरील व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. सोबत म्हटले की, हा व्हिडिओ राजस्थानमधील फलोदी गावातील आहे. 

इंडिया डॉट कॉम वेबसाईटवरदेखील या व्हिडिओची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यात म्हटले आहे की, या आजीबाईचे नाव भंवरीदेवी आहे. भंवरीदेवी यांच्या घरच्यांनी सांगितले की, माकड अचानक घरात घुसले आणि पलंगावर झोपलेल्या आजीबाईपाशी जाऊन बसले होते. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

अधिक शोध घेतल्यावर राजस्थानमधील न्यूज 24 प्लस नावाचे स्थानिक वेबपोर्टलने भंवरीदेवी आणि त्यांच्या कुटुंबाचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे आढळले. फलौदी गाव जोधपूर जिल्ह्यात येते.

या व्हिडिओमध्ये आजीबाई सांगतात की, “घरात हे माकड आले आणि सगळीकडे फिरू लागले. मग माझ्यापाशी येऊन बसले. मला कवटाळले, मिठी मारली, केसांमधून हात फिरवला. आम्ही त्याला टमाटे, बिस्किटे असे अनेक पदार्थ खायला दिले. परंतु, त्याने खाल्ले नाही. या माकडाने काहीच नुकसाने केले नाही.”

मग भंवरीदेवी या माकडाला रोज खाऊ घालायच्या का?

आजीबाईंच्या सुनेने माहिती दिली की प्रथमच हे माकड त्यांच्या घरात आले होते. यापूर्वी कधीही असे कोणतेही माकड त्यांच्या घरी किंवा भंवरीदेवीपाशी आले नव्हते. 

“हे माकड आम्ही पाळलेले नाही. पहिल्याच वेळी ते आमच्या घरात आले. आम्ही घरात बसलेलो असताना हे माकड काय माहिती कुठून आले? त्याला पाहून मुलांनी घाबरून आरडाओरडा सुरू केला. माकड सगळ्या घरात फिरले. मग पलंगावर झोपलेल्या आजीबाईपाशी गेले. मी त्यांना म्हणाले की, घाबरू नका. केवळ शांत बसा. मग त्या माकडाने अत्यंत प्रेमाने आजीबाईला मिठी मारली. हे दृश्य पाहून तर मी हातच जोडले,” असे त्या म्हणाल्या.

निष्कर्ष

या वरुन स्पष्ट होते की, राजस्थानमधील व्हिडिओ कोकणातील गावाच्या नावाने व्हायरल होत आहे. आजीबाईला मिठी मारणाऱ्या माकडाचा व्हायरल व्हिडिओ जामसंडे वळकूवाडीतील नाही. तो व्हिडिओ जोधपूर जिल्ह्यातील फलोदी गावातील आहे. 

तसेच त्या आजीबाई या माकडाला रोज खाऊ घालत नव्हत्या तसेच त्या आजारी पडल्या म्हणून ते माकड त्यांना भेटायला आले नव्हते.(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आजीबाई आणि माकडाचा तो व्हायरल व्हिडिओ कोकणातील नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False