FACT CHECK: 1963 साली ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाची फिल्म आली होती का?

False आंतरराष्ट्रीय

जगावर कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट गडद होत आहे. त्याविषयी विविध दावेसुद्धा केले जात आहे. त्यातच भर म्हणून आता एका चित्रपटाचे पोस्टर शेअर केले जात आहे. ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाचा हा चित्रपट 1963 साली प्रदर्शित झाला होता असा म्हटले जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हे पोस्टर बनावट आहे. अशा नावाचा कोणताही चित्रपट अस्तित्वात नाही.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाच्या फिल्मचे पोस्टर आहे. त्याची टॅगलाईन आहे – The Day The Earth Was Turned Into A Cemetery! 

हा इंग्रजी चित्रपट 1963 साली प्रदर्शित झाला होता, असे या पोस्टरबाबत म्हटले जात आहे.

तथ्य पडताळणी

1963 साली खरंच अशा नावाचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला होता का याचा शोध घेतला. या नावाचा कोणताही चित्रपट आढळला नाही. 

पोस्टरवर सॉल बास यांचे दिग्दर्शक म्हणून नाव आहे. त्यांची फिल्मोग्राफी तपासल्यावरही त्यांच्या नावे असा कोणताही चित्रपट आढळला नाही. 

सॉल बास हे जगप्रसिद्ध फिल्म पोस्टर डिझायनर आणि टायटल डिझायनर आहेत. सायको, व्हर्टिगो अशा चित्रपटाचे पोस्टर त्यांनी डिझाईन केले होते.

त्यांनी आयुष्यात केवळ एकच संपूर्ण लांबीचा चित्रपटा दिग्दर्शित केलेला आहे. त्याचे नाव आहे “फेज-4” आणि तो 1974 रोजी प्रदर्शित झाला होता. 

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, ‘फेज-4’ चित्रपटात नायजेल डेवेनपोर्ट, मायकल मर्फी, लीन फ्रिड्रेक मुख्य भूमिकेत होते. आणि या चित्रपटाची टॅगलाईनसुद्धा The Day The Earth Was Turned Into A Cemetery! अशी आहे. 

व्हायरल पोस्टरवरसुद्धा कलाकारांची नावे चित्रपटात नायजेल डेवेनपोर्ट, मायकल मर्फी, लीन फ्रिड्रेक अशीच दिलेली असून, टॅगलाईनसुद्धा तीच आहे.

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर ‘फेज-4’ चित्रपटाचे स्पॅनिश पोस्टर सापडले. ते व्हायरल होत असलेल्या पोस्टरशी मिळतेजुळते आहे. याचे स्पॅनिश नाव Sucesos en la IV Fase असे आहे.

मग हे द ओमिक्रॉन व्हेरिएंट नावाचे पोस्टर कोणी तयार केले?

बेकी चिटल या कलाकाराने हे पोस्टर तयार केले होते. फेज-4 नावाच्या चित्रपटाच्या पोस्टरला एडिट करून त्यांनी हे पोस्टर डिझाईन केले होते. 

त्यांनी स्वतः ट्विट करून हे मॉडिफाईड पोस्टर शेअर केले होते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, 70च्या दशकातील विविध साय-फाय चित्रपटांच्या पोस्टरला फोटोशॉपद्वारे एडिट करून त्यात द ओमिक्रॉन व्हेरिएंट असे पोस्टर तयार केले.

मूळ लिंक – ट्विटर

त्यांनी तयार केलेले हे पोस्टर चुकीच्या दाव्यासह व्हायरल होऊ लागल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे खुलासासुद्धा केला. 

त्यांनी लिहिले की, मी तयार केलेले एक पोस्टर स्पॅनिश भाषेत चुकीच्या माहितीसह पसरत असल्याचे मला कळाले आहे. माझ्या पोस्टरच्या वापर कोविड-19 केवळ बनाव असल्याचा पुरावा म्हणून केला जात आहे. कृपया कोणीही अशा भाकडकथांवर विश्वास ठेवू नये. ओमिक्रॉन व्हेरिएंट हे नाव सत्तरच्या दशकातील साय-फाय चित्रटांचे शीर्षक शोभून दिसते म्हणून मी ही पोस्टर तयार केली होती. कोणीही त्याचा गैरवापर करू नये.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, एका कलाकाराने तयार केलेल्या एका काल्पनिक फिल्म पोस्टरला लोक खरं मानत आहेत आणि सुचवू पाहत आहेत की, ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल 1963 सालीच चित्रपट आला आहे. परंतु, हे खरं नाही. बेकी चिटल या कलाकाराने फोटोशॉपद्वारे हे पोस्टर तयार केले आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:1963 साली ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाची फिल्म आली होती का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False