सांगलीत महापुरामुळे किंग कोब्रा आलेला नाही. हा व्हिडियो कर्नाटकमधील आहे. वाचा सत्य

False सामाजिक

सांगली जिल्ह्यामध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी ओसरल्यानंतर आता जीवनमान पूर्वपदावर येत असताना रोगराईसह इतर अनेक समस्यांचे आव्हान आहे. यातच भर म्हणून अफवा पसरतेय की, सांगलीत पुरामुळे किंग कोब्रासारखे विषारी साप आले आहेत. टीव्ही-9 मराठी वृत्तवाहिनीने तर सांगलीतील एका घरात सापडलेला किंग कोब्रा पकडण्याचा व्हिडियोदेखील शेयर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबकफेसुबक

काय आहे बातमीत?

टीव्ही-9 मराठीने 22 ऑगस्ट रोजी दिलेल्या बातमीनुसार, सांगलीतील एका घरात पुरात वाहून आलेला किंग कोब्रा साप आढळला. सर्पमित्र या सापाला पकडतानाचा एक व्हिडियोदेखील समोर आला आहे.नागरिकांच्या घरात अत्यंत विषारी कोब्रा साप निघत असल्याने महापुराचं पाणी ओसरुनही नागरिकांचा जीव सुरक्षित नसल्याचेच समोर येत आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टीव्ही-9 मराठीअर्काइव्ह

या बातमीमुळे फेसबुकवर हा मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. सांगलीत किंग कोब्रासारखा विषारी नाग आढळल्यामुळे लोकांमध्ये भीतीदेखील व्यक्त केली जाऊ लागली.

तथ्य पडताळणी

किंग कोब्रा हा एक दुर्मिळ साप आहे. तो प्रामुख्याने भारतातील पुर्व व दक्षिण भागात आढळतो. त्यामुळे सांगलीत हा साप येणे आश्चर्याची बाब आहे.

हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी सर्वप्रथम की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून युट्यूबवरील चार व्हिडियोज मिळाले. परंतु, हा व्हिडियो कुठला आहे, याची माहिती त्यामध्ये उपबल्ध नाही.

व्हिडियोत ऐकू येणारी भाषा मराठी नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या दक्षिण भाषिक टीमने ही भाषा ग्रामीण कन्नड असल्याचे सांगितले. हा धागा पकडून मग शोध सुरू केला. फ्रेंड्स ऑफ स्नेक्स सोसाईटी या सर्पमित्रांच्या संघटनेमार्फत कळाले की, हा व्हिडियो कर्नाटकमधील पश्चिम घाट या भागातील असू शकतो. या भागात किंग कोब्रा हा साप आढळतो.

या भागात काम करणाऱ्या कलिंगा सेंटर फॉर रेनफॉरेस्ट इकोलॉजी येथे संपर्क केला. त्यांनी हा व्हिडियो पाहून माहिती दिली की, यामध्ये दिसणाऱ्या सर्पमित्राचे नाव जयकुमार असून ते अगुम्बे रेनफॉरेस्ट रिसर्च स्टेशनसाठी (ARRS) काम करतात. ARRS च्या पालक संस्थेचे सहाय्यक क्युरेटर अजय कार्तिक यांनीदेखील हा व्हिडियो कर्नाटकमधील असल्याचे सांगितले. तसेच व्हिडियोत दिसणारे सर्पमित्र जयकुमार हे ARRS मध्ये बेस मॅनेजर आहेत, अशी त्यांनी माहिती दिली.

फॅक्ट क्रेसेंडोने मग जयकुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, हा व्हिडियो त्यांचाच असून त्यांनी कर्नाटकमधील चारा (ता. हेब्री, जि. उडपी) नावाच्या गावामध्ये हा साप पडकला होता. किंग कोब्रा प्रजातीचा हा साप सुमारे 13 फुटांचा होता. त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले. हा व्हिडियो तेथे उपस्थित गावकऱ्यांनी काढला असावा.

हेब्री येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वानीश्री हेगडे यांनीसुद्धा हा व्हिडियो चारा गावातील अनिल नाईक यांच्या घरातील असल्याचे सांगितले. फॅक्ट क्रेसेंडोने मग अनिल नाईक यांचा मुलगा प्रसाद यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, 8 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात हा विशाल साप सापडला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर सर्पमित्राच्या मदतीने त्याला पकडण्यात आले होते.

प्रसाद नाईक यांनी फॅक्ट क्रेसेंडोला त्यांच्या घराचा फोटो आणि त्यादिवशी साप पकडतानाचा त्यांनी काढलेला व्हिडियो पाठवला. यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो चारा गावातीलच आहे. तो सांगली किंवा महाराष्ट्रातील नाही. तो कर्नाटकमधील आहे. 

निष्कर्ष

कर्नाटकामधील चारा (ता. हेब्री, जि. उडपी) नावाच्या गावामध्ये पकडण्यात आलेल्या किंग कोब्रा सापाचा व्हिडियो सांगलीचा म्हणून पसरविण्यात येत आहे. चारा गावातील आनंद नाईक यांच्या घरी 8 ऑगस्ट 2019 रोजी हा साप निघाला होता. फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडियोत दिसणारे सर्पमित्र आणि घराचे मालक यांच्याशी थेट बोलून ही माहिती मिळवली.

Avatar

Title:सांगलीत महापुरामुळे किंग कोब्रा आलेला नाही. हा व्हिडियो कर्नाटकमधील आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False