FACT CHECK: मोबाईलच्या नादात ही आई खरंच बाळाला रिक्षात विसरली होती का? वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय राहणे जवळजवळ अशक्य झाले आहे. आपल्या व्यक्तित्वाचा अविभाज्य अंग बनलेल्या मोबाईलच्या व्यसनापायी कशातच लक्ष राहत नसल्याची तक्रार होत असते. याचेच एक उदाहरण म्हणून सध्या एक व्हिडियो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दावा केला जात आहे की, मोबाईलच्या नादात एक आई तिचे बाळ रिक्षातच विसरल्याचा हा व्हिडियो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची तथ्य पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

काय आहे व्हिडियोत?

या व्हिडियोमध्ये एक महिला फोनवबर बोलत चालताना दिसते. तिच्या मागे एक रिक्षावाला जोरजोराने ओरडतो, “ओ मॅडम…ओ मॅडम…” त्याच्या हातात एक चिमुकले बाळ आहे. त्याचा आवाज ऐकून मग ती महिला पळत माघारी येते आणि रिक्षावाल तिला बाळ देतो. या व्हिडियोला कॅप्शन दिली की, मोबाइलच्या नादात पोरगं रिक्षातच राहिलं. अवघड झालय आजकाल.

काही वृत्तपत्रांनी तर या व्हिडियोवरून बातमीसुद्धा प्रकाशित केली आहे.

तथ्य पडताळणी

25 सेंकदाच्या या व्हिडियो क्लिपचे व्यवस्थित निरीक्षण केले असता लक्षात येते की, ही रस्त्यावर उभे असलेले अनेक जण रिक्षावाला आणि महिलेला पाहत आहेत. काही जण मोबाईलमध्येसुद्धा शुटिंग करीत आहेत. आसपासची एवढी गर्दी पाहिली असता या व्हिडियोबाबत केल्या जाणाऱ्या दाव्याबाबत शंका उपस्थित होते. अनेकांनी ही टीव्ही/चित्रपटाची शुटिंग असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पीसीबी टुडे नावाच्या फेसबुक पेजनेसुद्धा हा व्हिडियो शेयर केला आहे. त्याखाली कमेंट म्हणून प्रशांत देशमुख नावाच्या युजरने याच घटनेचा आणखी एक व्हिडियो पोस्ट केला आहे. मनोज बारटक्के यांनीसुद्धा हाच व्हिडियो शेयर केला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये स्पष्ट दिसते की, रिक्षावाला म्हणून दिसणार व्यक्ती कॅमेऱ्यासमोर संवाद बोलत आहे.

या व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर युट्यूबवरदेखील हा व्हिडियो आढळला. तो तुम्ही येथे पाहू शकता.

या दोन्ही व्हिडियोची तुलना केल्यावर लगेच स्पष्ट होते की, हा चित्रपट किंवा टीव्ही सिरियलच्या शुटिंगचा आहे. रिक्षावाल्याची भूमिका करणारा कलाकार कॅमेऱ्यासमोर संवाद बोलत आहे. सोबत दिग्दर्शकसुद्धा उभा आहे. काही लोक मोबाईलवर शुटिंगसुद्धा करीत आहेत.

सोशल मीडियावर काही युजर्सने हा व्हिडियो नाशिकमधील असल्याची म्हटले आहे. त्यानुसार फॅक्ट क्रेसेंडोने हा व्हिडियो नाशिकमधील काही नागरिक आणि स्थानिक पत्रकारांना दाखवला. त्यातून कळाले की, हा व्हिडियो नाशिकमधील टाकळी फाटा, शंकरनगर भागातील आहे. हा धागा पकडून मग फॅक्ट क्रेसेंडोने या भागातील दुकानदार आणि नागरिकांशी संपर्क साधला. त्यांनी हा व्हिडियो पाहून हा व्हिडियो त्यांच्याच भागातील असल्याचे सांगितले.

मूळ नकाशा येथे पाहा – गुगल मॅप्स

मुंबई-आग्रा महामार्गावरील टाकळी फाटा बस स्टॉपपासून टाकळी रोडवर काही अंतरावर सुमारे दोन आठवड्यांपूर्वी एक शुटिंग झाली होती. हा व्हिडियो त्या शुटिंगचाच असल्याची येथील नागरिकांनी माहिती दिली. त्यावरून मग फॅक्ट क्रेसेंडोने ही नेमकी जागा गुगल मॅपच्या मदतीने शोधली. सोबत दिलेल्या नकाशात हा व्हिडियो नेमका कुठे चित्रित झाला ती जागा दाखविण्यात आली आहे.

निष्कर्ष

मोबाईलवर बोलण्याच्या नादात एक महिला आपल्या बाळाला रिक्षातच विसरल्याचा व्हिडियो एक शुटिंगचा आहे. सदरील महिला आणि रिक्षावाला अभिनेते आहेत. ती महिला बाळाला खऱ्याखुऱ्या बाळाला विसरली नव्हती.

Avatar

Title:FACT CHECK: मोबाईलच्या नादात ही आई खरंच बाळाला रिक्षात विसरली होती का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •