
गेल्या ऑक्टोबर महिन्यात ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेल्या आर्यन खानबाबत नववर्षाच्या सुरुवातीलचा नवा दावा व्हायरल होत आहे. विमानतळावरच सर्वांसमोर लघवी करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ शेअर करत म्हटले जात आहे की, हा तरुण म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ आर्यन खानचा नाही.
काय आहे दावा?
दीड मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये विमानतळावरील एक कर्मचारी नशेत धुंद असणाऱ्या तरुणाला सांभाळताना दिसतो. तो तरुण सर्वांसमोरच लघवी करू लागतो. शेवटी सुरक्षा कर्मचारी त्याला अटक करतात.
या व्हिडिओसोबत कॅप्शन दिली आहे की, “हा बघा शाहरुखपुत्र, आर्यन खान! चरसच्या नशेत परदेशात विमानतळावरच उभ्याने मुतत आहे! आणि भांगरवाले मलिक साहेब या नशेड्या साठी रोज पत्रकार परिषद घेत होते !”

तथ्य पडताळणी
व्हायरल व्हिडिओतील की-फ्रेम्सना रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडिओ सुमारे दहा वर्षे जुना आहे.
हॉलिवूडमधील सेलिब्रेटी न्यूज वेबसाईट ‘टीएमझी’ने (TMZ) 2012 साली या व्हिडिओची बातमी दिली होती. हॉलिवूड अभिनेता ब्रॉन्सन पेलेटिएरने (Bronson Pelletier) अमेरिकेतील लॉस एंजिलिस विमानतळावर नशेत धुंदावस्थेत उघडपणे लघवी केल्याचे यात म्हटले आहे.
टीएमझीच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे.
‘टुडे’च्या बातमीनुसार, ब्रॉन्सनला 19 डिसेंबर 2012 रोजी विमानतळावर लघवी करणे तसेच नशेत दुर्वर्तन केल्यामुळे अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याच्या दहा दिवसांपूर्वीच त्याला दारूच्या नशेत धिंगाणा घातल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते.
ब्रॉन्सन त्यादिवशी मर्यादेपेक्षा जास्त दारू पिलेला असल्यामुळे त्याला विमानातून खाली उतरविण्यात आले. नशा कमी झाल्यावरच त्याला पुढील विमानाने प्रवास करता येईल, असेसुद्धा सांगण्यात आले. परंतु, नशेत त्याने सर्वांसमोरच विमानतळावर लघवी केली. यामुळे सुरक्षारक्षकांना येऊन त्याला ताब्यात घ्यावे लागले. विमानतळ प्राधिकरणाने त्याच्याविरोध गुन्हासुद्धा नोंदविला होता.

कोण आहे ब्रॉन्सन पेलेटिएर?
मूळचा कॅनडाचा असलेल्या ब्रॉन्सनने ट्वाईलाईट चित्रपट सिरीजमध्ये अभिनय केलेला आहे. तसेच त्याने रेनेगेड प्रेस मालिकेतही भूमिका साकारलेली आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, हॉलिवडूमधील अभिनेत्याचा व्हिडिओ आर्यन खानच्या नावाचे चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. विमानतळावर लघवी करणारा तो तरुण आर्यन खाना नव्हता. त्याचे नाव ब्रॉन्सन पेलेटिएर असून, दहा वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:FAKE NEWS: आर्यन खानला नशेत विमानतळावर लघवी करताना पकडण्यात आले का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
