मोबाईल चार्जिंगला लावून बोलताना मेंदूला ‘शॉक’ लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही; वाचा सत्य

False सामाजिक

फेसबुकवर सध्या व्ह्यूव्ज आणि लाईक्स मिळवण्यासाठी ‘सामाजिक संदेश’ देण्याच्या नावाखाली स्क्रीप्टेड व्हिडिओ तयार करण्याची जणूकाही चढाओढ लागलेली आहे. अशा या नाट्यरूपी व्हिडिओतील प्रसंगांना खऱ्याखुऱ्या घटना मानून यूजर्सदेखील शेअर करत असतात. 

या ट्रेंडमध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. फोनवर बोलता बोलता कोसळलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की मोबाईल चार्जिंगला लावून बोलताना मेंदूला ‘शॉक’ लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की या व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. हे केवळ एक नाट्यचित्र आहे.

काय आहे दावा?

सीसीटीव्ही फुटेजसारख्या दिसणाऱ्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फोनवर बोलताना पाणी पिताना सोफ्यावर कोसळते. त्याची बायको त्याला उठविण्याचा प्रयत्न करते; पण तो पर्यंत उशीर झालेला असतो. 

या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले, की “खतरनाक आहे हे. प्रत्येकान काळजी घ्या. पाणी पित असताना आणि त्यात मोबाइल charging ला लावलेला….. जोरात मेंदूला शॉक लागलेला दिसतोय. खूप भयानक !!”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने अशा प्रकारच्या अनेक स्क्रीप्टेड व्हिडिओंची सत्यता समोर आणलेली आहे.

या व्हिडिओतील कीफ्रेम्सवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ व्हिडिओ आढळले. विशेषतः Sanjjanaa Galrani नावाच्या एका कन्नड अभिनेत्रीच्या फेसबुक पेजवर. 

या पेजवर जरी सदरील व्हिडिओ आढळला नाही, तरी या व्हिडियोतील दिसणारी जागा इतर व्हिडिओंमध्येसुद्धा असल्याचे लक्षात आले.

आपण शोधत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा गडद तपकिरी रंगाचा टीपॉय, पांढरा टेबल लॅम्प, निळा सोफा, भींतीवरील चित्र व मुखवटा, आणि कोपऱ्यातील निळ्या दरवाज्याचे कपाट या पेजवरील इतर व्हिडिओमध्येसुद्धा आहे. म्हणजे या एकाच घरात हे चारही व्हिडिओ चित्रित झालेले आहेत. 

स्क्रीप्टेड व्हिडिओ 1स्क्रीप्टेड व्हिडिओ 2स्क्रीप्टेड व्हिडिओ 3

पहिल्या व्हिडिओ लहान मुलांवर पालकांच्या व्यसानाधिनतेचा कसा परिणाम होतो हे दाखविले आहे. दुसऱ्या व्हिडिओत पाणी गरम करण्याच्या विद्युत-हीटरपाशी लहान मुलांना एकटे सोडण्याचा धोका दाखविला आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये प्रँकच्या नावाखाली भीती दाखविल्यामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो हे सांगितले आहे. 

या सर्व व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पेजचालकाने स्पष्ट म्हटले आहे, की हे सर्व व्हिडिओ न्याट्यचित्रे आहेत. केवळ मनोरंजनासाठी ते तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजेच व्हिडिओमध्ये काम करणारे हे लोक अभिनेते आहेत. 


“Please be aware that this page features scripted dramas and parodies as well. These short films are for entertainment & educational purposes only!”


निष्कर्ष

यावरून समजते की, फोन चार्जिंगला लावून बोलताना पाणी पिल्यावर व्यक्तीचा शॉक लागण्याचा हा व्हिडिओ केवळ एक नाटक आहे. ही खरी घटना नाही. एका स्क्रीप्टडे व्हिडिओला सत्य घटना समजून हा व्हिडिओ पसरविला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मोबाईल चार्जिंगला लावून बोलताना मेंदूला ‘शॉक’ लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False