अमेरिकेत ट्रेन प्रवाशावर थुंकण्याचा तो व्हिडियो जूना आहे. विनाकारण दिला जातोय धार्मिक रंग. वाचा सत्य

Coronavirus False

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याबरोबरच फेक न्यूज आणि दुष्प्रचारदेखील वेगाने पसरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती रेल्वेतील प्रवाशावर थुंकत असल्याचा व्हिडियो शेयर करून याद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. सदरील व्हिडियो विशिष्ट समुदायातील व्यक्ती कोरोना पसरवित असल्याचे म्हटले आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो जुना असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याचा कोरोनाशी काही संबंध नाही.

काय आहे फोटोमध्ये?

40 सेकंदाच्या या क्लिपमध्ये प्लॅटफॉर्मव उभा असलेला एक व्यक्ती रेल्वेमधील प्रवाशावर थुंकतो. मग तो आतमधील प्रवासी रेल्वेबाहेर येऊन थुंकणाऱ्याला चांगलीच अद्दल घडवितो. हा व्हिडियो अमेरिकेतील असल्याचे सांगत युजर दावा करीत आहेत की, बघा कसा थुंकणाऱ्या करोना जिहादीला फोडलाय… हे न्यूयॉर्कमध्ये झालंय.. भारतात पण होणार!

Train-1.png

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडियोची सत्यता पडताळण्यासाठी सर्वप्रथम त्यातील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून मेट्रो (यूके) वेबसाईटवरील 4 ऑगस्ट 2019 रोजीची बातमी आढळली. यामध्ये हा व्हिडियो न्यूयॉर्कमधील एका रेल्वेस्टेशनवरील असल्याचे म्हटले आहे. दोन प्रवाशांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांच्यामध्ये हाणामारी झाली असे बातमीत म्हटले आहे. सदरील व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर जगभरातील मीडियाने याची दखली घेतली.

Metro-1.png

मूळ बातमी येथे वाचा – मेट्रो (यूके)

अमेरिकेतीलच न्यूयॉर्क पोस्टनेदेखील 2 ऑगस्ट रोजी यांसंबधी बातमी प्रकाशित केली होती. रेडिट या वेबसाईटवर सदरील व्हिडियो पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. बातमीत म्हटले की, हे दोन व्यक्ती नेमके कोण आहेत आणि भांडणाचे नेमके कारण काय हे स्पष्ट नाही. सदरील प्रकरणी न्यूयॉर्क पोलिस किंवा मेट्रो पोलिसांकडे तक्रारदेखील दाखल करण्यात आलेली नव्हती.

रेडिटवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

Man spits on other Man in NYC and is hit with a surprise counterattack from r/PublicFreakout

मूळ व्हिडियो येथे पाहा – रेडिट

निष्कर्ष

कोरोना विषाणूचा उगम डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान शहरात झाला. त्यापूर्वी या विषाणूचे अस्तित्व जगात कुठेच नव्हते. सदरील व्हायरल व्हिडियो आठ महिन्यांपूर्वाचा म्हणजेच ऑगस्ट महिन्यातील आहे. याचा अर्थ की, या व्हिडियोचा कोरोनाशी काही संबंध नाही. दोन प्रवाशांमधील भांडणाचा हा व्हिडियो आहे. तसेच सदरील व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे हे स्पष्ट नाही. हे केवळ दोन प्रवाशांमधील वादाचे प्रकरण आहे. त्याला कोरोनाशी जोडून धार्मिक रंग देऊ नये.

Avatar

Title:अमेरिकेत ट्रेन प्रवाशावर थुंकण्याचा तो व्हिडियो जूना आहे. विनाकारण दिला जातोय धार्मिक रंग. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False