नेपाळच्या संसदेत नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य

False राजकीय

सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की, नेपाळच्या संसदेत तेथील खासदाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. सोबत एका नेत्याचा भाषण करतानाचा व्हिडिओ दिलेला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या  व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला. हा व्हिडिओ नेपाळचा नसून, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेतील  आहे. 

काय आहे दावा?

चार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिसणारा नेता मोदींवर सरकारी कंपन्यांचे खासगीकरण, परराष्ट्र धोरण, बिघडती अर्थव्यवस्था, बेरोजगारी अशा विविध मुद्यांवरून टीका केली आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “नेपाळच्या विधानसभेत चांगलंच सन्मानित करण्यात आले आपल्या यशस्वी माननीय,महनीय, प्रधान मंत्री यांना कुणी का असेना आरसा दाखवलाच…. सर्वांनी बघण्यासारखा व तितकाच विचार करायला लावणारा.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हिडिओला कीफ्रेम सर्च केले. त्यातून कळाले की हा व्हिडिओ नेपाळचा नसून, हिमाचल प्रदेश विधानसभेतील आहे. 

काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवरून गेल्या वर्षी (21 मार्च 2021) हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. सोबतच्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये काँग्रेस आमदार जगत सिंग नेगी यांनी नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. 

जगत सिंग नेगी हिमाचल प्रदेशमधील कनौर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षातर्फे आमदार आहेत. 2013 ते 2017 दरम्यान ते हिमाचल प्रदेश विधानसभेचे उपसभापतीदेखील होते. 

गेल्या वर्षी  विधानसभेत एका भाषणादरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ बराच गाजला होता. नेगी यांच्या फेसबुक पेजवरूनदेखील तो शेअर करण्यात आला होता. 

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडिओ नेपाळच्या संसदेतील नाही. काँग्रेस आमदार जगत सिंग यांनी हिमाचल प्रदेश विधान परिषदेत मोदींवर टीका करणारे भाषण केले होते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नेपाळच्या संसदेत नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False