
‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ नावाचा व्हिडिओ स्वीकारू नका कारण त्यात मोबाईल फॉरमॅट करणारा व्हायरस आहे, असा मेसेज व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ 9266600223 या क्रमांकावरून येत असल्याचे म्हटले जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
आमच्या पडताळणीत हा मेसेज चुकीचा आढळला. असा कोणताही व्हायरस असलेला व्हिडिओ नाही.
काय आहे दावा?
व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, “कृपया तुमच्या यादीतील सर्व संपर्कांना कळवा की ‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ नावाचा व्हिडिओ स्वीकारू नका. हा एक व्हायरस आहे जो तुमच्या मोबाईलला फॉरमॅट करतो. ते खूप धोकादायक आहे. त्यांनी आज रेडिओवरून त्याची घोषणा केली. हा MSG तुम्हाला शक्य तितक्या लोकांना Fwd करा. हाय अलर्ट कृपया हा क्रमांक ब्लॉक करा – 9266600223. ते क्रेडिट/डेबिट कार्ड हॅकर्स आहेत. कृपया आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना कळवा.”

तथ्य पडताळणी
सर्वप्रथम ‘अमित शहा यांनी मोदींना नाकारले’ अशी एखादी बातमी आहे का हे शोधले. कोणत्याही मीडिया वेबसाईटवर अशी बातमी आढळली. तसेच असा काही व्हिडिओ आहे का हे तपासले असता त्याबाबतही कोणतीही माहिती सापडली नाही.
मेसेजमध्ये म्हटल्याप्रमाणे रेडिओवर ‘अमित शहा यांनी मोदींना नाकारले’ अशा व्हायरस असलेल्या व्हिडिओविषयी कोणतीही सूचना जारी करण्यात आल्याचे दिसून आले नाही. भारतीय आकाशवाणी आणि प्रसार भारतीच्या वेबसाईटवर याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
म्हणजेच मेसेजमध्ये लिहिलेल्या माहितीला कोणताही पुरावा किंवा अधिकृत स्रोत नाही.
विशेष म्हणजे असाच मेसेज स्पेनमध्येसुद्ध व्हायरल झाला होता. स्पॅनिश पोलिसांनी तो बनावट असल्याचे सांगितले होते.
व्हिडिओद्वारे मोबाईलमध्ये व्हायरस जात नाही. त्यासाठी अँड्राईड फोनमध्ये .apk फाईल्स इन्स्टॉल करावी लागते. व्हिडिओ फॉरमॅट फाईलद्वारे ते होऊ शकत नाही.
विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी हाच मेसेज ‘सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना नाकारले’ अशा नावाने व्हायरल झाला होता. त्यावेळीदेखील तो बनावट आणि बोगस असल्याचे निष्पण्ण झाले होते.
9266600223 नंबरचे सत्य काय?
हा नंबर गेल्या अनेक वर्षांपासून स्कॅम आणि फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये समोर आला आहे. ट्रुकॉलर अॅपवर हा नंबर ‘केडिट कार्ड सेलर’ असा दाखवला जातो.

अधिक सर्च केल्यावर 9266600223 या नंबर विषयी 2016 मध्ये एका व्यक्तीने तक्रार दिल्याचे आढळले. ग्राहक तक्रार मंचाच्या वेबसाईटवर 6 डिसेंबर 2016 रोजी केलेल्या तक्रारीत म्हटले की, 9266600223 नंबरवरून गिफ्ट देण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डची माहिती विचारणारा कॉल आला होता.
तसेच 2020 साली काश्मीरमधील एका व्यक्तीला या नंबरवरून एका व्यक्तीने आर्मी ऑफिसर भासवून लुटले होते.
निष्कर्ष
‘अमित शहा यांनी मोदींना नाकारले’ असे व्हिडिओविषयक सदरील मेसेज बनावट आणि भ्रामक आहे. तसेच स्कॅम मेसेज आणि कॉल्सपासून सावध राहवे. बँक अकाउंटविषयी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये तसचे केवायसी अपडेट किंवा लॉटरी मेसेजच्या लिंकवर क्लिक करू नये. तसेच अनाधिकृत वेबसाईटवरून मोबाईल अॅप इन्स्टॉल करू नये.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:‘अमित शाह यांनी मोदींना नाकारले’ असा व्हिडिओ डाऊलोड केल्यावर फोन फॉरमॅट होतो का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
