ब्राझीलमधील चिखलमय रस्त्याचा व्हिडियो औरंगाबाद-जळगाव रोड म्हणून व्हायरल. पाहा सत्य

False आंतरराष्ट्रीय सामाजिक

औरंगाबाद-जळगाव महामार्गाची दयनीय अवस्था सोशल मीडियावर थट्टेचा विषय झाला आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन राजधानीला जगप्रसिद्ध अजिंठा लेणीशी जोडणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे आणि चिखलात रुतलेल्या वाहनांची कसरत दाखवणारे अनेक व्हिडियो आणि फोटो समोर आले. त्यात भर म्हणून आणखी एक व्हिडियो सध्या पसरत आहे.

औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर साचलेल्या चिखलात दुचाकी घसरून प्रवासी घरंगळत जात असल्याचा एक कथित व्हिडियो शेयर होत आहे. एक जोडपं दुचाकीवरून जात असताना औरंगाबाद-जळगाव रोडवरील चिखलात घसरून पडले आणि चिखलाता घरंगळत गेले, असा या व्हिडियोद्वारे दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून त्याची सत्य काय याबाबत विचारणा केली आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

औरंगाबाद-जळगाव रोडवरील चिखल आणि खराब अवस्था म्हणून इतर ठिकाणांचे फोटो/व्हिडियो यापूर्वी शेयर करण्यात आले होते. फॅक्ट क्रेसेंडोने त्याची तथ्य पडताळणी करून सत्य उजागर केले होते. त्यामुळे या व्हिडियोचीदेखील सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडूण गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

आलेल्या सर्च रिझल्टमध्ये युट्युबवरील Inverno Br-230 Transamazônica नावाचा 4 डिसेंबर 2018 रोजी अपलोड केलेला व्हिडियो आढळला. औरंगाबाद-जळगाव रोड म्हणून पसरविला जाणारा व्हिडियो आणि हा व्हिडियो एकच आहेत. खाली तो तुम्ही पाहू शकता. गुगलवर जेव्हा TRANSAMAZÔNICA विषयी शोधले तेव्हा कळाले की पोर्तूगीज भाषेतील या शब्दाचा इंग्रजीमध्ये Trans-Amazonian Highway असा अर्थ होता.

हा धागा पडकून अधिक शोध घेतला असता, व्हायरल हॉग नावाच्या युट्यूब चॅनेलवर हाच व्हिडियो शेयर करून माहिती दिली होती की, हा व्हिडियो ब्राझीलमधील पारा येथील आहे. 4 डिसेंबर 2018 रोजी ही घटना घडली होती. शहराच्या प्रवेशावरच पावसाळ्यात या रस्त्याची अशी अवस्था होते, असे म्हटले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडियो औरंगाबाद-जळगावा रोडचा नाही. तो ब्राझीलमधील एक रस्त्याचा व्हिडियो आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा – YouTube

TRANS-AMAZONIAN HIGHWAY

ब्राझीलमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांबीचा हायवे म्हणून ट्रान्स अ‍ॅमेझोनियन महामार्ग प्रसिद्ध आहे. अ‍ॅमेझॉन जंगलातून वाट काढून ब्राझीलमधील विविध राज्यांना जोडणारा हा BR-230 क्रमांकाचा हायवे एकुण 4000 किमी लांबीचा आहे. 1972 मध्ये सुरू झालेल्या या मार्गाच्या मोठ्या भागात पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात तर चिखलामुळे यावरून वाहन चालविणे धोक्याचे होऊन बसते.

सदरील व्हिडियो ब्राझीलमधील पारा राज्यातील म्हटले आहे. युट्यूबवर 1 डिसेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडियोनुसार ही जागा Medicilândia शहरातील आहे. तेथून जाणाऱ्या ट्रान्स अ‍ॅमेझोनियन महामार्गावरील एका चढावर चिखल साचून अशी स्थिती निर्माण होते. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

हा व्हिडियो ब्राझीलमधील मेडिसिलांडिया शहरातील ट्रान्स अ‍ॅमेझोनियन महामार्गावरील आहे. तो औरंगाबाद-जळगाव रोडचा नाही. त्यामुळे सदरील दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:ब्राझीलमधील चिखलमय रस्त्याचा व्हिडियो औरंगाबाद-जळगाव रोड म्हणून व्हायरल. पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False