ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाने केळीपासून कोरोनाची लस तयार केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

Coronavirus False Medical आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

कोरोना विषाणूची जागतिक साथ संपूर्ण जगाची परीक्षा पाहणारी ठरत आहे. दिवसेंदिवस बाधिक रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा वाढत आहे. त्यामुळे या महारोगावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक झपाटून काम करीत आहेत. अशातच अफवा उठली की, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाने केळीच्या जीवनसत्वापासून कोरोना प्रतिबंधक लस तयार विकसित केली आहे. तसा दावा करणारा एक व्हिडियोदेखील व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या तपासणीत हा दावा खोटा सिद्ध झाला.

काय आहे पोस्टमध्ये?

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडियो एका विदेशी वृत्तवाहिनीच्या बातमीसारखा भासतो. यामध्ये वृत्तनिवेदिका म्हणते की, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधक कोरोना विषाणूची प्रतिबंधक लस तयार करीत आहेत. सोबत ग्राफिक्समध्ये लिहून येते की, विद्यापीठातील संशोधकांनातून सिद्ध झाले की, केळीतील ब-6 जीवनसत्वाच्या मुबलक प्रमाणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोज केळी खा आणि कोरोनापासून सुरक्षित राहा.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक 

या व्हिडियोच्या आधारे दैनिक लोकमतध्ये 16 मार्च 2020 रोजी बातमी छापली. यात म्हटले की, केळीतील जीवनसत्वाद्वारे कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड तंत्रविद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला. या बातमीचे कात्रण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीची सत्यता पडताळणी करण्याची विनंती केली.

89652802_2577014745953030_1187530050430304256_o.jpg

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील व्हिडियोच्या की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले असता ABC News (Australia) वृत्तवाहिनीची 23 जानेवारी 2020 रोजी प्रकाशित बातमी आढळली. सदरील व्हायरल क्लिप याच व्हिडियोतून घेतलेली आहे. या व्हिडियोमध्ये म्हटले की, ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड विद्यापीठातील संशोधक कोरोना प्रतिबंधक लस विकसित करीत आहेत. यात त्यांना प्राथमिक यश मिळाले असून, लवकर ती तयार करण्यात येईल असा संशोधकांना विश्वास आहे.

या संपूर्ण व्हिडियोमध्ये कुठेही केळीचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे केळीचे ग्राफिक्सदेखील या मूळ व्हिडियोमध्ये नाही. 

अधिक शोध घेतल्यावर लक्षात आले की, हा सदरील व्हायरल क्लिप दोन वेगवेगळ्या व्हिडियोला एकत्र करून तयार करण्यात आली आहे. तिच्यामधील सुरवातीचा भाग ABC News (Australia) च्या बातमीतून तर उर्वरीत भाग वॉल स्ट्रीट जर्नलच्या व्हिडियोतून घेतलेला आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोना प्रतिबंधक लस कशी तयार करत आहेत याचा हा रिपोर्ट आहे.  यामध्येदेखील केळीचा उल्लेख नाही. केळीविषयी कोणताही दावा नाही.

या सर्व विसंगती पाहून फॅक्ट क्रेसेंडोने थेट क्विन्सलँड विद्यापीठाशी ईमेलद्वारे संपर्क साधला. सदरील बातमी आणि व्हिडियोतील दाव्यांविषयी आम्ही त्यांना स्पष्टीकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना विद्यापीठाने सांगितले की, हे सर्व दावे खोटे आहेत. क्विन्सलँड विद्यापीठाने केळीच्या जीवनसत्वासंदर्भात कोरोना विषाणूशी निगडित कोणताही दावा केलेला नाही. सदरील व्हायरल व्हिडियो क्लिप फेक आहे. कोणीही ती शेयर करून नये असे आवाहन करण्यात येते.

विद्यापीठातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “क्विन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात प्राथमिक यश मिळवले आहे. केळीपासून नाही तर, अत्याधुनिक मॉलिक्युलर क्लॅम्प तंत्रज्ञानाचा वापर करून ही लस तयार करण्यात येत आहे.” सोबत त्यांनी या लसीविषयक सविस्तर माहितीदेखील शेयर केली. ती तुम्ही येथे वाचू शकता – University of Queensland 

मग कोरोनाची प्रतिबंधक लस  किंवा तयार झाली आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोरोनावर लस किंवा औषध उपलब्ध नाही. जगभरातील औषध कंपन्या आणि वैज्ञानिक ही लस तयार करण्याचे प्रयत्न करीत आहेत. काहींची प्राथमिक चाचणी झाली आहे. परंतु, सर्वांना लागू पडेल अशी कोणतीही लस विकसित झालेली नाही. तसेच कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. त्यासाठी केवळ वारंवार हात धुण्याचा सल्ला WHO ने दिला आहे. याविषयी अधिक येथे वाचा – WHO

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापीठाने केळीच्या जीवनसत्वापासून कोरोना प्रतिबंधक लस विकसित केल्याचा दावा केलेला नाही. तसेच केळी खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होत नाही असेदेखील या विद्यापीठाने म्हटलेले नाही. सदरील दावे करणारा व्हिडियो बनावट आहे. 

Avatar

Title:ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाने केळीपासून कोरोनाची लस तयार केल्याची बातमी खोटी. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •