
नवउद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या रतन टाटा यांनी नुकतेच एका मराठमोळ्या तरुणाच्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली. अर्जुन देशपांडे असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या जेनेरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली. परंतु, यानंतर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, रतन टाटा यांनी जेनरिक आधार या स्टार्ट-अपमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली.
फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता तो खोटा असल्याचे सिद्ध झाले.
काय आहे दावा?
न्यूज-18 लोकमतने 7 मे रोजी बातमी दिली की, रतन टाटांनी 18 वर्षीय तरुणाच्या फार्मसीमध्ये 50 टक्के भागीदारी खरेदी केली. कराराच्या किंमतीबाबत माहिती मिळालेली नाही. 3 ते 4 महिन्यांपूर्वी अर्जुनने टाटांना कंपनीबद्दल सांगितले होते. रतन टाटांनी अर्जुनच्या कल्पनेमध्ये उत्सुकता दाखवली आणि त्यांनादेखील त्याचा मेंटर बनून काम करावेसे वाटले. अर्जुनने दिलेल्या माहितीनुसार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.

संपूर्ण बातमी येथे वाचा – न्यूज-18 लोकमत । अर्काइव्ह | झी न्यूज । अर्काइव्ह | सामना । अर्काइव्ह
याच आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाल्या. त्यात म्हटले गेले की, अर्जुन देशपांडे, आमचा मराठमोळा १८ वर्षाचा व्यवसायिक, आज त्याच्या जेनेरिक आधार या कंपनीत श्री रतन टाटा 50 टक्के भागीदार झालेत.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
मग खरं काय आहे?
तथ्य पडताळणी
रतन टाटा यांनी गुंतवणूक केल्यानंतर अर्जुन देशपाडे याने एबीपी माझा चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यात त्याने टाटा यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केले अशी कोणतीही माहिती दिली नाही. त्याने केवळ एवढेच म्हटले की, “माझे काम रतन टाटा यांना आवडल्यामुळे त्यांनी गुंतवणूक केली. किती गुंतवणूक केली ती उघड करता येणार नाही.”
जेनेरिक आधार कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये कुठेही 50 टक्के भागीदारी खरेदी केल्याचा उल्लेख नाही. सर्व भारतीयांना स्वस्तात औषधी पोहचविण्याच्या उद्देशाने अर्जुनने जेनेरिक आधार ही कंपनी सुरू केली होती. त्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभावित होऊन रतन टाटा यांनी त्याच्या मिशनमध्ये हातभार लावण्याचे ठरविले, असेय या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे. ही प्रेस रिलीज खाली वाचू शकता.
यानंतर फॅक्ट क्रेसेंडोने थेट अर्जुन देशपांडे याच्याशी संपर्क केला. त्याने सांगितले की, “रतन टाटा यांनी माझ्या कंपनीत 50 टक्के भागीदारी विकत घेतलेली नाही. त्यांनी केवळ वैयक्तिकरीत्या माझ्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.”
माध्यमांमध्ये रतन टाटा यांनी 50 टक्के भागीदारी विकत घेण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर टाटा यांनी स्वतः या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विट केले की, या तरुणाच्या उद्योगाला मदत केल्याचा मला आनंद आहे. त्याच्या स्टार्ट-अपमध्ये मी केवळ छोटीशी टोकन इन्वेस्टमेंट केली आहे. मी त्याच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी खरेदी केलेली नाही.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, अर्जुन देशपांडे याच्या जेनेरिक आधार या कंपनीत रतन टाटा यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केलेली नाही. त्यांनी केवळ वैयक्तिक गुंतवणूक केलेली आहे. स्वतः रतन टाटा आणि अर्जुन देशपांडे यांनी 50 टक्के भागीदारीच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:रतन टाटा यांनी मराठमोळ्या मुलाच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी खरेदी केली का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Partly False
