विद्युत तारांवर चालणारा तो लाईनमन कोकणातील नाही; हा व्हिडियो तेलंगणामधील

False सामाजिक

सोशल मीडियावर सध्या एका जिगरबाज लाईनमनचा व्हिडियो व्हायरल होत आहे. विद्युत तारांमध्ये अकडकलेल्या झाडाची फांदी काढण्यासाठी हा लाईनमन तारांवर चालत गेला. हा व्हिडियो कोकणातील देवगड शिरगाव येथील असल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता हा व्हिडियो तेलंगणा येथील असल्याचे समोर आले.

काय आहे व्हिडियोमध्ये?

सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती खांबावर चढतो व नंतर तारांवर हात व पायांच्या सहाय्याने चालत जात अडकलेली फांदी काढतो व नंतर सुरक्षित खाली उतरतो. व्हिडियोसोबत कॅप्शन आहे की, “कोकणातील देवगड शिरगाव येथे तारेवरील झाडाची फांदी काढतांना आपला लाईनमन. सँल्यूट MSEB”.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

हा व्हिडियो नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी गुगलवर विविध की-वर्ड्सचा वापर केला. त्यातून 1 जून रोजी एका ट्विटर युजरने हाच व्हिडियो शेयर केल्याचे आढळले. यामध्ये त्याने हा व्हिडियो तेलंगणा येथील निझामपूर येथील असल्याचे म्हटले आहे. 

हा धागा पकडून शोध घेतला असता IANS या वृत्तसंस्थेची बातमी व अधिकृत ट्विट आढळले. त्यानुसार, सोमवारी (1 जून) रोजी तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील सदाशिव पेठ मंडल भागातील निझामपूर येथे ही घटना घडली होती. हैदराबादपासून 75 किमी अंतरावर हे गाव आहे.

अर्काइव्ह

हिंदुस्थान टाईम्सच्या बातमीनुसार, तारांवर चालणाऱ्या या लाईनमनचे नाव नूर असून तो तेथील विद्युत विभागात कंत्राटी कामगार आहे. वारा आणि पावसामुळे त्या भागातील वीज पुरवठ खंडीत झाला होता. तारांमध्ये फांदी अडकल्याची माहिती मिळाल्यावर हे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. नूर याने साहस करीत तारांवर चढून फांदी काढली. त्यावेळी उपस्थितांनी त्याच्या कारनाम्याचा व्हिडियो चित्रित केला होता.

सोशल मीडियावर एकीकडे या लाईनमनच्या साहसाचे कौतुक होत आहे तर, दुसरीकडे विद्युत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयीदेखील चिंता व्यक्त केली जात आहे. सदरील व्हिडियो इतका व्हायरल झाला की, आंतरराष्ट्रीय मीडियानेदेखील त्याची दखल घेतली. इंग्लंडमधील मिरर ऑनलाईन वेबसाईटनेदेखील त्याची बातमी केली. टाईम्स इंडियाच्या युट्यूब चॅनेलवरदेखील हा व्हिडियो शेयर करण्यता आला आहे.

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीदेखील कोकणातील म्हणून हा व्हिडियो ट्विट केला होता. परंतु, तो तेथील नसल्याचे कळाल्यावर त्यांनी ते ट्विट डिलीट केले.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, तारांवर चालणाऱ्या या लाईनमनचा हा व्हिडियो कोकणातील नाही. हा व्हिडियो तेलंगणामधील निझामपूर भागातील आहे. 

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:विद्युत तारांवर चालणारा तो लाईनमन कोकणातील नाही; हा व्हिडियो तेलंगणामधील

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False