
ऐकावे ते नवलच! कॉलेज प्रशासनाने अजब नियम काढणे तशी नवी गोष्ट नाही. मग ते मुलींच्या कपड्यांवरून असो किंवा हॉस्टेलमध्ये परत येण्याचे मुलं व मुलींसाठी वेगवेगळे टाईमिंग असो. परंतु, सध्या आयआयटीसारख्या देशातील आघाडीच्या एका कॉलेजने विद्यार्थ्यांच्या हस्तमैथुन करण्यावरच नोटीस काढल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. IIT Roorkee च्या हॉस्टेलमध्ये नोटीस लावून विद्यार्थ्यांना बाथरूमध्ये हस्तमैथुन करण्यास मनाई करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) याची पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे नोटीसमध्ये?
व्हायरल फोटोतील नोटीसीमध्ये लिहिले की, बाथरूममध्ये (शॉवर) हस्तमैथुन करणे आयआयटी रुडकीच्या हॉस्टेलच्या नियमांचा भंग आहे. वीर्यामुळे बाथरूमच्या ड्रेनेज पाईप चोक-अप होतात. त्यामुळे दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त खर्च होतो. याचा परिणाम म्हणजे पुढील वर्षाची हॉस्टेल शुल्कात वाढ करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रुममध्येच हस्तमैथुन करावे.
21 ऑगस्ट रोजी काढलेल्या या नोटीसीवर प्रमुख वॉर्डन आशुतोष चामोली यांचे नाव व सही आहे.
अनेकांनी या नोटीसीवरून कॉलेज प्रशासनाची खिल्ली उडवली आहे.
तथ्य पडताळणी
नोटीसमध्ये आयआयटी रुडकी कॉलेजच्या राजेंद्र भवन हॉस्टेलचे नाव आहे. फॅक्ट क्रेसेंडोने थेट या हॉस्टेलशी संपर्क साधला. हॉस्टेलमध्ये अशी कोणतीही नोटीस लावली नसल्याचे राजेंद्र भवन हॉस्टेलतर्फे सांगण्यात आले. येथील निवासी वॉर्डन अक्षय पांडे यांनी फॅक्ट क्रेसेंडोला माहिती दिली की, ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली “मास्टरबेशन नोटीस” खोटी आहे. राजेंद्र भवन हॉस्टेल किंवा आयआयटी रुडकी कॉलेज प्रशासनतर्फे अशी कोणतीही नोटील लावलेली नाही. कोणीतरी खोडकरपणा करून अशी नोटीस सोशल मीडियावर पसरविली आहे. कोणीही त्यावर विश्वास ठेवू नये.’

नोटीसचे व्यवस्थित निरीक्षण केल्यावर खालील बाबी लक्षात येतात.
1. नोटीसीमध्ये Indian Institute of Roorkee Hostel म्हटले आहे. मूळात ते Indian Institute of Technology Roorkeee असे पाहिजे होते.
2. प्रमुख वॉर्डन आशुतोष चामोली यांची व्हायरल होत असलेल्या नोटीसीवरील सही आणि राजेंद्र भवन हॉस्टेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असणाऱ्या एका नोटीसीवरील सही यांची तुलना केल्यावर कळते की, दोन्हीमध्ये फरक आहे. खोटी सही करणाऱ्याने चामोली यांची स्वाक्षरी कॉपी करण्याचा प्रयत्न केला परंतु, तो तितकासा यशस्वी ठरला नाही.

3. अधिकृत नोटीसीवर प्रमुख वॉर्डनचा शिक्का लावला जातो. व्हायरल नोटीसवर तो नाही.
तसेच कोणत्याच आयआयटी कॉलेजच्या हॉस्टेल नियमांमध्ये या नोटीसीप्रमाणे नियम आढळून येत नाही.
विशेष म्हणजे, 2016 मध्ये कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठानेसुद्धा अशीच नोटीस काढल्याचा फोटो व्हायरल झाला होता. बँगलोर मिरर बातमीनुसार, तो फोटोसुद्धा खोटा होता.
हॉस्टेलच्या बाथरूमध्ये हस्तमैथुन न करू देण्याची नोटीस व्हायरल होण्याचा प्रकार तसा जूना आहे. देशाविदेशातील नामांकित विद्यापीठे आणि कॉलेजच्या नावे अशी फेक नोटीस सोशल मीडियावर फिरत असते. हफपोस्टने तर अशा 25 व्हायरल नोटीसीचे संकलनसुद्धा केले आहे. विशेष म्हणजे या नोटीसचा मजकूर बहुतांश सारखाच असतो.

मूळ बातमी येथे वाचा – हफपोस्ट । अर्काइव्ह
निष्कर्ष
आयआयटी रुडकीच्या विद्यार्थ्यांना बाथरुममध्ये हस्तमैथुन न करण्याची नोटीस खोटी आहे. कॉलेजच्या राजेंद्र भवन हॉस्टेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशी कोणतीही नोटीस हॉस्टेलमध्ये लावण्यात आलेली नाही.

Title:IIT Roorkee कॉलेजने विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये हस्तमैथुन न करण्याची नोटीस लावली का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
