मुंबईच्या राजभवनातील भुयाराचे फोटो रायगड जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False राष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

जुने भुयार सापडल्याची बातमी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरते. जणु इतिहासात जाण्याचाच तो मार्ग असतो. अशाच एका रहस्यमय भुयाराचे गुपित उलगडल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एका डोंगरात भुयारी मार्ग सापडल्याचा दावा केला जात आहे. सोबत या भुयाराचे फोटोसुद्धा शेयर केलेले आहेत. 

फोटोमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री भुयाराची पाहणी करत असल्याचे दिसते. हे भुयार थेट मुंबईच्या शिवाजी छत्रपती टर्मिनस (CST) रेल्वेस्टेशनपर्यंत जाते असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. सदरील पोस्ट सुमारे 1200 वेळा शेयर करण्यात आली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली आहे.

C:\Users\Fact8\Desktop\Archive\Raigad Tunnel.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोंना गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर लगेच कळते की, ही पोस्ट खोटी आहे. हे फोटो रायगडमधील श्रीवर्धन येथील डोंगरात सापडलेल्या भुयाराचे नाहीत. हे फोटो तर तीन वर्षांपूर्वी मुंबईतील राजभवनात सापडलेल्या 150 मीटर लांबीच्या ब्रिटीशकालीन भुयाराचे आहेत. रेडिफ वेबसाईटवरील बातमीनुसार, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे शासकीय निवास्थान असलेल्या मलबार हील येथील राजभवनात ऑगस्ट 2016 साली हे भुयार सापडले होते.

मूळ बातमी येथे वाचा – रेडिफअर्काइव्ह

न्यूज-18 लोकमतच्या बातमीनुसार, गेल्या अनेक दशकांपासून बंद असलेल्या या बंकरमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या 13 रूम आहेत. हे बंकर 20 फूट उंच आहे. त्याचे आणखी एक द्वार पश्चिमेला आहे. खूप मोठा पॅसेज असून छोट्या छोट्या रुम्सही सापडल्या आहेत.

हे बंकर सुमारे 5000 स्केअर फूटांचे असून याची लांबी 150 मीटर आणि उंची 20 फूटाची आहे. या भुयाराचा वापर दारूगोळा, काडतुसे, इतर युद्ध साहित्य ठेवण्यासाठी होत असावा असा कयास आहे.

राजभवनात एक न उघडलेले भुयार असल्याची माहिती मिळाल्यावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी ते उघडण्याचे आदेश दिले होते. 12 ऑगस्ट 2016 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुयाराच्या पूर्वेला असलेली भिंत तोडली आणि समोर आलं हे ब्रिटीशकालीन भुयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या बंकराल भेट देऊन तपासणी केली होती. त्यांनी ट्विटरवरदेखील या भेटीचे फोटो शेयर केले होते.

झी न्यूजच्या बातमीनुसार, राजभवनाचा इतिहास पाहिला तर याला गर्व्हमेंट हाऊस म्हटले जायचे. ब्रिटीश सरकारचे रहिवासाचे 1885 पासून हे ठिकाण आहे.  लॉर्ड रे यांनी आपले 1885 पासून आपले कायमचे राहण्याचे ठिकाण केले. 1885 पूर्वी मलबार हिल हे ब्रिटिश गव्हर्नरांचे उन्हाळ्याचे वास्तव्याचे ठिकाण होते. एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील याविषयीच बातमी तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील डोंगरात सापडलेल्या भुयारीचे म्हणून जे फोटो शेयर होत आहेत ते मुळात मुंबईतील राज्यपाल निवास राजभवनात तीन वर्षांपूर्वी सापडलेल्या भुयाराचे आहेत. त्यामुळे सदरील पोस्ट खोटी ठरते.

Avatar

Title:मुंबईच्या राजभवनातील भुयाराचे फोटो रायगड जिल्ह्यातील म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •