Fact Check : आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे का?

False सामाजिक

अंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप ऊडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा. असे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. महाराष्ट्रीय असाल तर पेज लाईक करा या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

पश्चिम घाटात, कोकणात आणि पुणे विभागात दरडी कोसळण्याचा घटना पावसाळ्यात सातत्याने घडत असतात. अनेकदा यात वित्तच नव्हे तर जीवितहानी देखील झालेली आहे. माळीणची घटना आजही प्रत्येकाच्या स्मृतीत आहे. पुणे आणि मुंबईसारख्या शहरातही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आंबोली घाटात नुकतीच अशी कोणती घटना घडली आहे का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी कोणतीच घटना नुकतीच घडल्याचे आम्हाला दिसून आले नाही. 

आम्हाला प्रश्न पडला की मग हा व्हिडिओ नेमका पश्चिम घाटातील किंवा कोकणातील आहे का? आम्ही नीट पाहिले असता या व्हिडिओत अपघातग्रस्त कार उजव्या बाजूने येत असल्याचे आम्हाला दिसले. पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात आणि भारतात अशा पध्दतीने वाहने चालवली जात नाहीत. खालील दृश्यात आपण ही कार उजव्या बाजूने येत असल्याचे स्पष्ट पाहू शकता.

हा व्हिडिओ पश्चिम घाटातील नसल्याचे स्पष्ट झाल्यावर हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली. आम्ही या व्हिडिओतील काही दृश्यांचा रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतला. त्यावेळी आम्हाला काही परिणाम दिसून आले. यापैकी Dr Janine Krippner यांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटवर आम्ही गेलो. याठिकाणी Kirill Bakanov@WeatherSarov या रशियातील हवामानविषयक वृत्तांकन करणाऱ्याने हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आम्ही युटूयूबवर या व्हिडिओचा शोध घेतला असता डेली मेलने 13 ऑक्टोबर 2018 रोजी हा व्हिडिओ युटूयूबवर अपलोड केला असल्याचे दिसून आले. आपण खाली हा व्हिडिओ पाहू शकता. 

डेली मेलच्या संकेतस्थळावर आपण याबाबतचे वृत्त आपण पाहू आणि वाचू शकता. या वृत्तानुसार दक्षिण-पश्चिम चीनमधील तिबेटमध्ये 3 ऑक्टोबर 2018 रोजी ही घटना घडली आहे. कारच्या पुढील भागावर दरड कोसळल्याने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही.

डेली मेल 

निष्कर्ष

कारच्या पुढील भागावर दरड कोसळल्याची ही घटना दक्षिण-पश्चिम चीनमधील तिबेटमध्ये 3 ऑक्टोबर 2018 रोजी घडली आहे. आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याची माहिती असत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact Check : आंबोली घाटात कारवर दरड कोसळल्याचा हा व्हिडिओ आहे का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False