
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या एका पित्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डॉक्टरांनी एका मुलीला बळजबरीने कोविड-19 घोषित करून दुसऱ्या मुलीकडे दुर्लक्ष केले व तिचा मृत्यू झाला, असा आरोप पित्याने केला आहे. ही घटना नागपुरमधील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडिओची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील आहे.
काय आहे दावा?
सुमारे चार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये नरेंद्र गेहलोत नामक व्यक्ती मीडियाला मुलाखत देताना सांगतो की, “माझ्या दोन मुलींना पोटात दुखू लागल्यामुळे दवाखान्यात भरती केले होते. तेथे डॉक्टरांनी मोठ्या मुलीला कोविड-19 वॉर्डात हलविले. मी यास विरोध केला की, मुलीला कोविड नाही. पण डॉक्टरांनी त्याचे ऐकले नाही. लहानी मुलगी सामान्य वॉर्डात तशीच तडफडत राहिली आणि तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीचा कोविड अहवाल निगेटिव्ह आला; पण तिची तब्येत अत्यंत खालावल्यामुळे उपचार सुरू आहेत. एका मुलीचा अंत्यसंस्कार करून मी आलोय पण डॉक्टर आता मला दुसऱ्या मुलीला भेटू देत नाहीत. मला धमकी देत बाहेर काढले. यांच्या निष्काळजीपणामुळेच माझी मुलगी दगावली.”
मूळ व्हिडिओ येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडिओ नीट ऐकल्यानंतर लक्षात येत की, सदरील व्यक्तीने स्वतःचे नाव नरेंद्र गेहलोत सांगितले आहे आणि एके ठिकाणी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला आहे. हा धागा पकडून मग की-वर्ड्सद्वारे सर्च केले.
त्यातून टाईम्स ऑफ इंडियाची 9 ऑगस्ट 2020 रोजी प्रकाशित झालेली बातमी आढळली. त्यानुसार, ही घटना मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील आहे. नरेंद्र गेहलोत यांनी त्यांच्या दोन मुली शिवानी आणि पायल यांना 6 ऑगस्ट रोजी भोपाळच्या हमीदिया दवाखान्यात भरती केले होते. तेथे शिवानीचा मृत्यू झाल्यानंतर नरेंद्र यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय आयुक्त कविंद्र कियावत यांनी त्रिसदस्य समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया
नरेंद्र गेहलोत यांचा दुसरा एक व्हिडिओ दैनिक भास्करच्या वेबसाईटवर आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. यात ते त्या दिवशी नेमके काय झाले हे सांगतात. डॉक्टरांनी त्यांना योग्य माहिती दिली नाही तसेच उपचारांमध्ये दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मूळ बातमी येते वाचा – दैनिक भास्कर
भोपाळच्या विभागीय राज्यजनसंपर्क विभागाने 8 ऑगस्ट रोजी हमीदिया हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आय. डी. चौरसिया यांचे स्पष्टीकरण प्रसिद्ध केले होते. त्यानुसार, दवाखान्यात आणले तेव्हा दोन्ही मुलींची तब्येत अत्यंत खालावलेली होती. चौकशीअंती स्पष्ट झाले की, डॉक्टरांनी उपचारांमध्ये कोणतीही दिरंगाई अथवा हलगर्जीपणा केला नव्हता. प्रोटोकॉलनुसार त्या मुलींवर उपचार करण्यात आले. नरेंद गहलोत यांनी भावनेच्या भरात डॉक्टरांवर आरोप केले. परंतु, त्यात काही सत्यता नाही.
नई दुनिया या न्यूजपोर्टलने 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या बातमीनुसार, नरेंद्र गेहलोत यांच्या दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिची तब्येत अधिक खराब झाली. सहा दिवसांच्या उपचारांनंतर पायलनेसुद्धा अखेरचा श्वास घेतला.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, मुलींच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करणाऱ्या त्या पित्याचा व्हिडिओ भोपाळमधील आहे. तो चुकीच्या माहितीसह नागपुरचा म्हणून शेयर केला जात आहे.
(आपल्याकडील संशयास्पद मेसेजची सत्यता जाणून घ्यायची आहे? तर मग तो पाठवा फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांकावर 9049053770)

Title:डॉक्टरांवर आरोप करणाऱ्या पित्याचा तो व्हिडिओ नागपुरचा नसून भोपाळचा आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
