
स्वीडनच्या माल्मो शहराती गेल्या शुक्रवारी (28 ऑगस्ट) भीषण दंगल उसळली होती. या हिंसाचारावरून सोशल मीडियावर विविध दावे करून सांप्रदायिक अपप्रचार केला जात आहे. मुस्लिमांनी आधी ‘बायबल’ ग्रंथ जाळला व त्याला प्रत्युत्तर म्हणून ख्रिश्चन समाजातील काही लोक ‘कुराण’ जाळण्याच्या तयार असताना मुस्लिमांनी स्वीडनमधील शहर पेटवून दिले, असा मेसेज सध्या फिरत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने मेसेजची पडताळणी केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले. जाणून घ्या दंगल उसळण्यामागील खरे कारण…
काय आहे दावा?
मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रॉयटर्स वृत्तसंस्था आणि स्थानिक वृत्तस्थळ द लोकल दिलेल्या बातमीनुसार, अती-उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते रासमुस पालुदन हे 28 ऑगस्ट रोजी माल्मो शहरात सभा घेणार होते. पालुदन हे त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्य आणि मुस्लिमांविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.
तर अशा या पालुदन यांच्या शुक्रवारच्या सभेत ‘कुराण’ जाळण्यात येणार होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्यांच्या सभेला परवानगी नाकारत त्यांना शहरात येण्यास बंदी घातली. यामुळे त्यांचे समर्थक चिडले व त्यांनी शहरातील चौकात निदर्शने करीत धार्मिक ग्रंथ ‘कुराण’ची अवमान केला.
दरम्यान, आदल्या दिवशी ‘कुराण’ जाळल्याचा एक व्हिडियो माल्मो शहरात व्हायरल झाला होता. याचा निषेध करण्यासाठीसुद्धा लोक चौकात जमले होते. अशा परिस्थितीतून शहरात दुपारी हिंसाचाराला सुरुवात झाली होती.
मूळ बातमी येथे वाचा – रॉयटर्स । अर्काइव्ह
यामध्ये कुठेही मुस्लिमांनी ‘बायबल’ ग्रंथ जाळल्याचा उल्लेख नाही. तसेच स्वीडिश भाषेतील स्थानिक वृत्तस्थळांनीसुद्धा माल्मो दंगलीच्या बातम्यांमध्ये ‘बायबल’ जाळल्याचे म्हटलेले नाही.
फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट स्वीडिश पोलिसांच्या वेबसाईटला भेट दिली. तेथे माल्मो शहराचे पोलिस प्रमुख स्टीफन सिंटेयुस यांनी घटनेची अधिकृत माहिती देणारी प्रेस रिलीज प्रकाशित केलेली आहे.
त्यातील माहितीनुसार, ‘कुराण’ जाळणे आणि विनापरवानगी जमाव एकत्र येऊन ‘कुराण’ ग्रंथाचा अपमान केल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी माल्मो शहरात हिंसाचार उफाळला. पोलिस आणि वाहनांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी 15 लोकांना अटक करण्यात आली व दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले. परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेले आहे.
प्रेस रिलीजमध्येसुद्धा ‘बायबल’ जाळल्याचा उल्लेख नाही.
मूळ प्रेस रिलीज येथे वाचा – स्वीडिश पोलिस । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोने मग थेट स्वीडिश पोलिसांशी संपर्क साधला. माल्मो शहरातील पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी कॅल परसन यांनी माहिती दिली की, ‘बायबल’ जाळण्याची कोणतीही घटना आमच्या समोर आली नाही. माल्मो शहरातील दंगल अशा घटनेमुळे सुरू झाली नव्हती.
फॅक्ट क्रेसेंडोने माल्मो शहरातील स्थानिक पत्रकारांकडेसुद्धा याबाबत विचारणा केली. त्यांनीदेखील दंगल ‘कुराण’ जाळणे आणि रासमुस पालुदन यांच्य समर्थकांची निदर्शने यातून झाल्याचे सांगितले.
दरम्यान, स्वीडनमधील दंगल मुस्लिमांनी दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्यामुळे घडल्याचा दावा यापूर्वी केला जात होता. त्यासंदर्भात फॅक्ट क्रेसेंडोने तथ्य पडताळणी करून तो खोटा ठरविला होता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, मुस्लिमांनी ‘बायबल’ जाळल्याची माहितीला काही आधार नाही. अती-उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे नेते रासमुस पालुदन यांना सभेची परवानगी नाकरल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी ‘कुराण’चा अवमान केला. तत्पूर्वी माल्मो शहरात ‘कुराण’ जाळल्याचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. यातून ही दंगल उसळली होती.

Title:स्वीडनमध्ये मुस्लिमांनी आधी ‘बायबल’ जाळल्यामुळे दंगल पेटल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
