बीबीसीने भाजपला जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात भ्रष्ट पक्ष घोषीत केले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

बीबीसीने जाहीर केलेल्या जगातील सर्वात भ्रष्ट पक्षांच्या यादीत भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या कथित यादीमध्ये पाकिस्तान, युगांडा आणि क्युबा या देशातील पक्षांनंतर भारतातील भाजपचा क्रमांक लागतो. पोस्टमध्ये म्हटले की, बीबीसीच्या जागतिक अहवालानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग (पाकिस्तान), नॅशनल रेसिस्टन्स मुव्हमेंट (युगांडा) आणि प्रोग्रेसिव्ह अ‍ॅक्शन पार्टी (क्यूबा) आणि भारतीय जनता पार्टी (भारत) हे जगातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक 

तथ्य पडताळणी

बीबीसीने जर असा खरंच अहवाल किंवा यादी प्रसिद्ध केली असेल तर तो त्यांच्या वेबसाईटवर नक्कीच उपलब्ध असणार. परंतु, बीबीसीची वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंटवर असा कोणताही अहवाल आढळला नाही. त्यामुळे या यादीच्या सत्यतेविषयी शंका वाढते.

गुगलवर अधिक सर्च केल्यावर कळाले की, बीबीसीच्या नावे गेल्या काही वर्षांपासून जगातील भ्रष्ट पक्षांची यादी तयार करण्याचा अहवाल खपवला जातो. यामध्ये पूर्वी चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे नाव दिले जायचे. कधी बीबीसी तर कधी सीएनएनच्या नावे अशी यादी दिली जात असे. याचे एक उदाहरण तुम्ही खाली पाहू शकता.

मग ही यादी आली कुठून?

बीबीसीच्या नावे हा अहवाल पसरण्याचे कारण म्हणजे 17 मार्च 2017 रोजी BBC News Point नावाच्या एका वेबपार्टलने Top 10 Most Corrupt Political Party In The World 2017 असा लेख प्रकाशित केला होता. यामध्ये चौथ्या क्रमांकावर भारतातील काँग्रेस पक्षाचे नाव होते. पोर्टलवरून ही यादी डिलीट करण्यात आली असून त्याचे अर्काइव्ह व्हर्जन येथे वाचू शकता.

पोर्टलच्या नावात BBC नाव असल्याने अनेकांना ही वेबसाईट आणि पर्यायाने बातमी खरी वाटली. परंतु, BBC News Point या वेबसाईटचा मूळ बीबीसीसोबत काही संबंध नाही. केवळ वाचकांना आकर्षित करण्यासाठी नावात BBC लिहून डोमेन नाव घेण्यात आलेले आहे. या वेबसाईटची WHOIS वर माहिती तपासली असता कळाले की, ही वेबसाईट पाकिस्तानमधील पंजाब प्रांत येथून नोंदणीकृत झालेली आहे. यावरून लक्षात येते की, बीबीसीशी या पोर्टलचा काही संबंध नाही. 

बीबीसीच्या नावे यापूर्वीसुद्धा अशा खोट्या बातम्या पसरविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याचे गुप्त सर्वेक्षण बीबीसीने केल्याचे म्हटले जाते. बीबीसीने स्वतः स्पष्ट केले की, ते असा कोणताही सर्व्हे करत नाहीत. असे मेसेज खोटे आहेत. तसेच बीबीसीमध्ये काम करणाऱ्या अनेक पत्रकारांनीसुद्धा वेळोवेळी अशा खोट्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहेत.

निष्कर्ष

बीबीसीने जगातील सर्वात भ्रष्ट राजकीय पक्षांची कोणतीही यादी प्रसिद्ध केलेली नाही. तसेच भाजपला सर्वाधिक भ्रष्ट पक्षांपैकी एक असेसुद्धा बीबीसीने घोषित केलेले नाही. त्यामुळे सदरील पोस्ट खोटी आहे.

Avatar

Title:बीबीसीने भाजपला जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात भ्रष्ट पक्ष घोषीत केले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False