औरंगाबादमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या खोट्या पोस्ट व्हायरल; उत्तराखंडमधील खून चुकीच्या माहितीसह व्हायरल 

False सामाजिक

सूटकेसमधील मृतदेहाचे फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, औरंगाबादमध्ये मुस्लिम युवकाने एका हिंदू मुलीला फसवून लग्न करून तिची हत्या केली. व्हायरल पोस्टमध्ये मुलीचे नाव स्नेहा नागरे आणि आरोपीचे नाव समीर बेग म्हटलेले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य आहे. उत्तराखंडमधील खूनाचे फोटो चुकीच्या माहितीसह पसरविले जात आहे. 

काय आहे दावा?

एका मुलीचा व सूटकेसमधील मृतदेहाचा एकत्र फोटो शेअर करून म्हटले आहे की, औरंगाबादमध्ये स्नेहा नागरे या मुलीला समीर बेगने खोटे लग्न करून मारून टाकले.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

पोस्टमधील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, मृतदेहाचा हा फोटो उत्तराखंडमध्ये झालेल्या खून प्रकरणातील मुलीचा आहे. 

‘न्यूज-18 हिंदी’ वेबसाईटच्या बातमीनुसार, उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील कलियर येथील एका हॉटेलमध्ये प्रियकराने त्याच्या प्रेयसीची 24 मार्च रोजी हत्या केली होती. आरोपीला सूटकेसमधून प्रेयसीचा मृतदेह घेऊन जात असताना हॉटेल मालकाने पकडले होते. 

संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोपीची सूटकेस उघडली असता त्यात मुलीचा मृतदेह आढळला. आरोपीने आधी खोटे सांगितले की, मुलीने आत्महत्या केली. परंतु, पोलिसांच्या तपासात त्याने मान्य केले की, त्यानेच मुलीची हत्या केली होती.

मूळ बातमी – न्यूज-18 हिंदी

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, आरोपीचे नाव गुलझेब हुसैन अन्सारी आहे. मृत मुलीचे नाव रमसा अन्सारी असून, दोघांचे प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते म्हणून त्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी प्रेयसीचा खून केला. 

मृत मुलीचे काका मोहम्मद युनूस अन्सारी यांनी सांगितले की, रमसा त्यांच्या कुटुंबातील पहिलीच पदवीधर मुलगी होती. 

मूळ पोस्ट – टाईम्स ऑफ इंडिया 

फॅक्ट क्रेसेंडोने रुरकीचे पोलिस उपअधीक्षक विवेक कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट केले की, सूटकेसमधून प्रेयसीचा मृतदेह घेऊन जाण्याचे प्रकरण उत्तराखंडमधील आहे. तसेच या खूनामागे लव्ह जिहाद किंवा सांप्रदायिक कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.

“या खून प्रकरणातील आरोपी आणि मृतक मुलगी दोघेही मुस्लिम होते. त्यांचे प्रेमसंबंध होते. आरोपी मुलाने 24 मार्च रोजी प्रेयसीचा खून केला आणि मृतदेह सूटकेसमधून घेऊन जात असताना त्याला पकडण्यात आले. मुलीचे वडिल राशिद यांच्या फिर्यादीनुसार आरोपी गुलझेब विरोधात कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे,” असे विवेक कुमार म्हणाले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो उत्तराखंडमध्ये झालेल्या खूनाचा आहे. मृतक मुलीचे नाव स्नेहा नागरे नाही तर रमसा अन्सारी होते आणि आरोपीचे नाव समीर बेग नाही तर गुलझेब अन्सारी होते. एकाच धर्माच्या व्यक्तींमधील प्रेमप्रकरणातून झालेल्या या खूनामागे लव्ह जिहाद किंवा इतर कोणतेही सांप्रदायिक कारण नव्हते. औरंगाबादमध्ये असा कोणताही गुन्हा घडलेला नाही. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:औरंगाबादमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या खोट्या पोस्ट व्हायरल; उत्तराखंडमधील खून चुकीच्या माहितीसह व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False