विरारमधील साईनाथनगर पेट्रोलपंपाला भीषण आग लागली होती का? काय आहे या व्हिडियोचे सत्य

False सामाजिक

मुंबईतील एका पेट्रोल पंपाला भीषण आग लागल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर शेयर केला जात आहे. काहींना हा व्हिडियो विरार पूर्व भागातील साईनाथनगर पेट्रोल पंपाचा म्हटला आहे तर, काहींनी नालासोपारा भागातील सेंट्रल पार्क येथील पेट्रोल पंपाचे नाव घेतले आहे. हळहळ व्यक्त करताना एकाने लिहिले की, हा पेट्रोल पंप भरवस्तीत आहे. त्याला लागून अनेक दुकानं आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) हा व्हिडियो पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

भरवस्तीतील पेट्रोल पंपाला आग लागणे खूप गंभीर घटना आहे. व्हिडियोत दिसणाऱ्या आगीचे स्वरूप पाहता या पेट्रोलपंपाचे खूप नुकसान झाल्याची शक्यता आहे. फेसबुकवर काहींनी या व्हिडियोच्या सत्यतेबाबत कमेंट करून शंका उपस्थित केली आहे. ही पेट्रोल पंपाल लागली नसल्याचे एकाने लिहिले तर, दुसऱ्याने म्हटले की, पंपाच्या बाजूच्या दुकानाला ही आग लागली होती.

विजयकुमार मिश्रा नामक एका युजरने 1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता या आगीचा फोटो शेयर करून लिहिले की, विरारयेथील साईनाथनगर मधील पेट्रोल पंपाजवळ विद्युत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली आहे. ट्रान्सफॉर्मरपाशी असणारी टायर रिपेअरिंगच्या दुकान आगीत राख झाली. लवकर आग विझवली नाही तर इतर दुकांनामध्ये ती पसरण्याची शक्यता आहे. विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्याता आली असून, सुरक्षा उपाय म्हणून परिसरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अग्नीशामक दलालासुद्धा अर्ध्या तासापूर्वी फोन करून माहिती देण्यात आलेली आहे. (भाषांतर)

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

या माहितीच्या आधारे आम्ही साईनाथनगर येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या अँटॉन रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क केला. साईनाथनगर पेट्रोलपंपाला आग लागली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, एक तारखेच्या रात्री पंपापासून जवळच असणाऱ्या टायर-पंक्चर रिपेअरिंग करणाऱ्या दुकानाला ही आग लागली होती. परंतु, आमच्या पेट्रोल पंपाला या आगीचा काही फटका बसला नाही. त्यामुळे साईनाथनगर पेट्रोलपंपाला आग लागली असे म्हणने चूक आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने मग वसई-विरार शहर नगरपालिकेच्या फुलपाडा अग्नीशमन दलाशी संपर्क केला. फायरमन सोपान पाटील यांनी माहिती दिली की, रात्री साडेदहाच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली होती. साईनाथनगर पेट्रोल पंपाजवळ घटनास्थळी पोहोचल्यावर तीन गाळ्यांतील दुकानांना आग लागल्याचे दिसले. थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवत विझवली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग पेट्रोल पंपाला लागली होती का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर नकारार्थी दिले.

निष्कर्ष

मुंबईतील विरार (पूर्व) भागातील साईनाथनगर पेट्रोल पंपाला आग लागली नव्हती. एक ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास या पंपाशेजारी असणाऱ्या टायर दुरुस्तीच्या दुकानाला आग लागली होती. हा व्हिडियो त्याचा आहे. पेट्रोल पंपाचे मालक आणि अग्नीशामक दलाने या वृत्ताला दुजारो देत व्हिडियोसोबत केला जात असलेला दावा खोटा असल्याचे सांगितले.

Avatar

Title:विरारमधील साईनाथनगर पेट्रोलपंपाला भीषण आग लागली होती का? काय आहे या व्हिडियोचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False