
सध्या कोंबड्यांमध्ये असणारा ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू कोरोनापेक्षा भयंकर असून जर तो माणसांमध्ये पसरला तर जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या संपेल असा दावा सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. डॉ. मायकल ग्रेगरी यांच्या पुस्तकाचा दाखला देत काही जण हा दावा करत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने कोंबड्यांमध्ये ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू अस्तिवात आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी
सध्या कोंबड्यांमध्ये ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू अस्तित्वात आहे का? हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम प्राण्यांच्या आरोग्यावर संशोधन करणाऱ्या ओआयई या संघटनेच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी 2020 मध्ये प्राण्यांमध्ये आढळलेल्या विविध विषाणूंची आणि आजारांची माहिती देण्यात आली आहे. या यादीत कोठेही ॲपोकॅलिप्टिक नावाच्या विषाणूचा उल्लेख दिसून आला नाही. ही संपूर्ण यादी आपण येथे (संग्रहित) पाहू शकता.
त्यानंतर आणखी शोध घेतल्यावर ब्रिटनमधुन प्रसिध्द होणाऱ्या मिरर या दैनिकाच्या संकेतस्थळावरील 30 मे 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तात कुकुटपालन केंद्रातून म्हणजेच पोल्ट्री फार्ममधून पसरणारा विषाणू जगातील निम्मी लोकसंख्या संपवेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिल्याचे म्हटले आहे. जागतिक महामारीतून कसे वाचता येईल, या पुस्तकात अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांनी या बाबीचा उल्लेख केल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील अनेक संकेतस्थळांनी याबाबतचे वृत्त दिल्याचेही दिसून आले. याठिकाणी ॲपोकॅलिप्टिक व्हायरस असा शब्दप्रयोग दिसून येतो. त्यानंतर् मराठी प्रसारमाध्यमांनी (संग्रहित) याबाबतचे वृत्त दिल्याचेही दिसून आले. पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ॲपोकॅलिप्टिक नावाचा कोणताही विषाणू अस्तित्वात नाही. जगाचा नाश करणारा या अर्थाने ॲपोकॅलिप्टिक हा शब्द आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांनी वापरला असावा. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठानेही याला दुजोरा दिलेला आहे.

निष्कर्ष
यातून हे स्पष्ट झाले की, सध्या कोंबड्यांमध्ये ॲपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू अस्तित्वात आहे ही बाब असत्य आहे. डॉ. मायकल ग्रेगर यांनी केवळ विषाणूंचे संकर्मण कसे होऊ शकते, याचा दिलेला तो इशारा आहे.

Title:कोंबड्यामध्ये ॲपोकॅलिप्टीक नावाचा विषाणू अस्तित्वात नाही; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
