
गदर – 2 या चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चित्रपट सुरू असताना सिनेमा गृहामध्ये मारहाण होताना दिसते.
या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, गदर – 2 या चित्रपटादरम्यान एका व्यक्तीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या म्हणून लोकांनी त्याला चोप दिला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. या ठिकाणी “पाकिस्तान जिंदाबाद” असा नारा देण्यात आला नव्हता.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये सिनेमागृहात गदर – 2 हा चित्रपट चालू असताना एका व्यक्तीला काही लोक मारहाण करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “चित्रपटगृहामध्ये गदर 2 चालू असताना अचानक कोणीतरी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाला आणि गदर 3 चालू झाला पाठीमध्ये नुसतेच गुदुडे घातले.”
मूळ पोस्ट – फेसबुक |
तथ्य पडताळणी
कीव्हड सर्च केल्यावर ए.बी.पी गंगा या युट्यूब चॅनलवर या घटनेचा व्हिडिओ आढळला. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या बरेली शहरातील प्रसाद नावाच्या सिनेमा गृहामध्ये घडली होती.
दैनिक भास्करच्या बातमीनुसार 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता प्रसाद या सिनेमागृहामध्ये गदर – 2 ह्या चित्रपटाचा शो सुरू होता. चित्रपट सुरू असताना अचानक एका दृश्यावरून दोन व्यक्तिंमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यापैकी एक तरुण दारूच्या नशेत होता. हाणामारीदरम्यान त्याने बेल्टने समोरच्या व्यक्तीवर हल्ला केला. त्यामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला आणि शो थांबवावा लागला.
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जमावाला नियंत्रित केले. परंतु, पोलिस येताच बेल्टने मारहाण करणाऱ्या आरोपीने तेथून पळ काढला.
या ठिकाणी कुठेही सिनेमा हॉलमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा उल्लेख आढळत नाही.
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने कोतवाली स्टेशनचे प्रभारी धर्मेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. चित्रपटादरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा कुठल्या ही घोषणा दिल्या गेल्या नव्हत्या. तसेच या घटनेत हिंदू-मुस्लिम वाद नाही.
चित्रपटादरम्यान एक व्यक्ती एका दृश्याचा फोटो काढत असताना दुसऱ्या व्यक्तीसोबत वाद सुरू झाला आणि वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी झाली.
निष्कर्ष
या वरुन सिद्ध होते की, व्हिडिओमध्ये पाकिस्तान जिंदाबाद नारा देण्यात आला नव्हता. चुकीच्या दाव्यासह मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:गदर-2 पाहताना ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिल्याने मारहाण करण्यात झाली का? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
