हरियाणाच्या गुरुग्राम जिल्ह्यातील मल्हेडा गावात एका मुस्लिम युवकाने एका हिंदू मुलीची चाकू मारून हत्या केली, या दाव्यासह एका व्हिडिओ व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये मुलीला मारणारा आरोपी मुस्लिम नव्हता. या घटनेत कोणतेही सांप्रदायिक कारण नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला युवकाला मारत मारत खुनाचा जाब विचारत आहे. तसेच, रस्त्यावर युवतीचे मृतदेह पडलेला आहे.

या व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे की, “लव्ह जिहादचा व्हायरस हा कोरोना पेक्षाही धोकादायक आहे. जो दिवसेंदिवस वाढत चालला आहे, हे मी आधीही सांगितले होते. गुरुग्रामच्या मल्हेडा गावाता एका अब्दुलने एका हिंदू मुलीची चाकूने वार करून हत्या केली आणि तिथे उभे असलेले काही धर्मनिरपेक्ष हिंदू व्हिडिओ बनवत राहिले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर टीव्ही-9 भारतवर्षच्या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळला.

व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार गुरुग्राममध्ये मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याने एका युवकाने मुलीच्या आईसमोरच चाकू भोसकून तिची हत्या केली.

ही घटना गुरुग्राममधील पालम विहार पोलिस स्टेशन परिसरात घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केले.

https://youtu.be/3uD79gPcw-k

एबीपी न्यूजच्या बातमीनुसार, ही घटना 10 जुलै रोजी दुपारी 12 वजता घडली होती.

आरोपीचे नाव राजकुमार (वय 23) असून तो मुल्लाहेडा गावाचाच रहिवासी आहे.

आरोपी राजकुमारचा पीडित मुलीशी साखरपुडा झाला होती. परंतु, मुलीच्या आईने काही कारणास्तव त्यांच्या लग्नाला नकार दिला.

10 जुलै रोजी पीडिता व तिची आई रस्त्यावरून जात असताना आरोपीने त्यांच्यावर लग्नाचा दबाव टाकला. रागाच्या भरात आरोपीने मुलीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. यावेळी आसपासच्या नागरिकांनी हस्तक्षेप केला नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने गुरुग्राममधील सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) वरुण कुमार दहिया यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “या घटनेतील आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही हिंदू आहेत. तसेच हे लव्ह जिहाद किंवा हिंदू-मुस्लिम प्रकरण नाही. यामागे कोणतेही सांप्रदायिक कारण नाही.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडओसोबत केलेला लव्हजिहादचा दावा चुकीचा आहे. या घटनेतील आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी दोघेही हिंदू असून या घटनेमागे कोणतेही सांप्रदायिक कारण नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुरुग्राममधील मुलीच्या हत्या प्रकरणाशी लव्ह जिहादचा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False