Fact Check : मुंबईत बेस्टच्या बसेसवर रिक्षावाल्यांनी दगडफेक केली का?

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

बेस्टचे तिकीटाचे भाव कमी झाल्याने बांद्रा पूर्व ते बीकेसी बस स्थानक रिक्षा वाल्याने दगड पैक करून बसेस फोडल्या ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे, अशी पोस्ट Vijay Gore यांनी शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. 

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी

बेस्ट बसचे तिकीट दर कमी झाल्याने मुंबईत बसवर कुठे दगडफेक दगडफेक झाली का? याचा आम्ही शोध घेतला. मुंबईत बसवर दगडफेकीची नुकतीच कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यावेळी आमच्या लक्षात आले.

त्यानंतर आम्हाला या व्हिडिओचे नीट निरीक्षण केल्यावर यावर जीजे असे लिहिल्याचे दिसून आले. अनेकांनी मुंबईतील बेस्टच्या बस अशा दिसतात का? या बस गुजरातमधील सुरतच्या असल्याचे या व्हिडिओत प्रतिक्रियेत म्हटल्याचेही दिसून आले. गूगलवर आम्ही इंग्रजीत ‘stone pelting on local city buses’ असे टाकून शोध घेतल्यावर आम्हाला खालील परिणाम दिसून आला. 

या परिणामात असे दिसून आले द टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तात म्हटले आहे की, मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या वृत्तात बसगाड्यांवर दगडफेक झाल्याचे कुठेही म्हटलेले नाही. द टाईम्स ऑफ इंडियानेच दिलेल्या दुसऱ्या वृत्तानुसार सुरतमध्ये अल्पसंख्याक समुदायाने देशभरात होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांविरोधात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या घटनेत शहरातील बसेसवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात सहा जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

द टाईम्स ऑफ इंडिया / Archive

त्यानंतर गुगलवर आम्ही आणखी काही माहिती मिळते का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ‘Rally against mob lynching in Surat’ असा शब्दप्रयोग करुन शोध घेतला असता खालील परिणाम समोर आला. 

यातील ‘Divyang News Channel’ या वृत्तवाहिनीच्या व्हिडिओत ही बस स्पष्ट दिसून येत आहे.  

या व्यतिरिक्त अनेक वृत्तवाहिनीच्या आणि वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांनी या घटनेचे वृत्त दिले आहे. ते आपण खाली पाहू शकता. 

हे सगळे व्हिडिओ पाहिल्यास हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ मुंबईतील नसून तो गुजरातमधील सुरत या शहरातील 5 जुलै 2019 रोजी घडलेल्या घटनेचा आहे. मुंबईत कुठेही दगडफेकीची अशी घटना घडलेली नाही. मुंबई आणि महाराष्ट्रात रिक्षा संघटनांनी दरवाढीसाठी पुकारलेला बंदही शांततेत पार पडलेला आहे. यातही हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. दरम्यान आम्ही बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी हा व्हिडिओ पाहिला असून मुंबईत अशी कोणतीही घटना घडलेली नाही. हा व्हिडिओ अन्य कोणत्यातरी शहरातील असावा. 

निष्कर्ष

मुंबईतील जनजीवन सुरळित चालू असून मुंबईत बेस्टच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. याबाबत व्हायरल करण्यात येत असलेली व्हिडिओ आणि माहिती असत्य आहे. बेस्टच्या सुत्रांनीही बेस्टची सेवा सुरळित सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी अशा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Avatar

Title:Fact Check : मुंबईत बेस्टच्या बसेसवर रिक्षावाल्यांनी दगडफेक केली का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •