गुजरातमधील दगडफेकीचा व्हिडियो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

False सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या दंगलीसंबंधी सोशल मीडियावर फेक न्यूजचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक करतानाचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, तो दिल्लीतील आहे. एवढेच नाही तर आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या ओखला विधानसभा क्षेत्रातील हा व्हिडियो असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडियो अहमदाबाद येथे दोन महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा असल्याचे समोर आले. 

काय आहे दावा?

भररस्त्यावर जमाव पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करीत असल्याचा व्हिडियो शेयर करीत लिहिले की, कपिल मिश्रामुळे दंगल उसळली होती म्हणे हे बघा. दिल्लीतील एका ठिकाणचा विडिओ मीडिया नाही दाखवणार कारण सर्व धर्म समभाव चा किडा अंगात आहे त्याच्या आपचा आमदार अमानतुलाह खान ओखला विधान सभा क्षेत्राचा आहे. चला काश्मीरमध्ये दगडफेक कमी झाली इथे वाढली… नीट विडिओ पाहिलात तर नक्की डोक्यात प्रकाश जाईल तुमच्या याना का गोळ्या घालू नये याचे उत्तर द्या मला

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर कळेल की, दुकानांच्या पाट्या गुजराती भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. 

म्हणून मग युट्यूबवर गुजरातशी निगडीत दगडफेकीचे व्हिडियो शोधले असता टीव्ही-9 गुजराती चॅनेलवरील 19 डिसेंबर 2019 रोजीची एक बातमी आढळली. त्यानुसार, अहमदाबाद शहरातील शाह आलम भागातील ही घटना आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात तेथे सुरू असलेल्या आंदोलना हिंसक वळण लागले आणि जमावाने गुजरात पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये 19 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. 

या हिंसक आंदोलनानंतर अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनीही प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणी 32 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हिंसक आंदोलन करणाऱ्यांची ओळख पटवली जात असल्याची त्यांनी माहिती दिली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहमदाबाद अकाउंटद्वारे या आंदोलनाचे व्हिडियो शेयर करण्यात आले होते. ते तुम्ही येथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा व्हिडियो दिल्लीतील नाही. तो व्हिडियो अहमदाबादमध्ये दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेचा आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे.

Avatar

Title:गुजरातमधील दगडफेकीचा व्हिडियो दिल्ली दंगीलाचा म्हणून व्हायरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •