STATUE FACT: झारखंड येथील मूर्तीचे फोटो इराकमध्ये सापडलेली रामाची मूर्ती म्हणून व्हायरल

False आंतरराष्ट्रीय

भारत देश पूर्वी अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत विस्तारलेला होता, असे म्हटले जाते. भारताच्या सीमा एवढ्या विस्तीर्ण होत्या याचे वेगवेगळे दाखले सोशल मीडियावर दिले जातात. सध्या अशीच एक पोस्ट समाजमाध्यमावर वाचकांना भूरळ घालत आहे. त्यामध्ये इराकमध्ये रामाची मूर्ती सापडल्याचा दावा केला जात आहे. पुरावा म्हणून सोबत पुरातन मूर्तीचा फोटोदेखील शेयर केलेला आहे. काही जणांनी ही मूर्ती सहा हजार वर्षे जूनी असल्याचेही म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये मातीने माखलेल्या तीन मूर्तींचा फोटो दिलेला आहे. सोबत लिहिले की, इस्लामिक मुल्क इराक में खुदाई के दौरान प्रभु श्रीराम, लखन, जानकी जी निकले. अखंड भारत के सभी अंग चीख चीख कर बोल रहे है हिन्दू एक हो हम सब तेरे है।

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पोस्टमध्ये दिलेल्या फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून द अ‍ॅनालिस्ट नावाच्या वेबसाईटवर 5 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध झालेला एक हिंदी लेख समोर आला. मुरारी शरण शुक्ल यांनी लिहिलेल्या या लेखात पोस्टमध्ये शेयर केलेला फोटो दिलेला आहे. लेखाच्या शीर्षकानुसार, या मूर्ती झारखंडमध्ये सापडल्या होत्या. लेखामध्ये म्हटले की, झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील भंडरा पंचायतअंतर्गत येणाऱ्या जिलिंगा गावात 4 जानेवारी 2019 रोजी राम, सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती सापडली होती. यासोबतच दोन शंख, एक धुपदानी, धातूपासून तयार केलेला बैलामीच मूर्ती आणि शालिग्राम सदृश्य दोन गोलाकार दगडदेखील यावेळी गावकऱ्यांना मिळाले होते.

मूळ लेख येथे वाचा – द अ‍ॅनालिस्टअर्काइव्ह

आणखी शोध घेतल्यावर लोक-आलोक नावाच्या एका वेबसाईटवर या संदर्भात बातमी आढळली. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या इंद जत्रेच्या तयारीसाठी सोमा टुटी नावाचा एक ग्रामस्थ घराला लेप देण्यासाठी एका मोकळ्या मैदानातून माती काढत होता. खोदत असताना एका टणक वस्तूला त्याची कुदळ लागली. माती बाजूला केल्यावर त्याला या मूर्ती दिसल्या. पाच पिढ्यांपूर्वी येथे महेंद्रनाथ ठाकूर नावाचा एका राजा होता. त्यांच्याच मंदिरातील या मूर्ती असण्याची शक्यता गावाचे प्रमुख झिरगा मुंडा यांनी व्यक्त केली. या मूर्ती पाहण्यासाठी आसपासच्या गावातील लोक गर्दी करीत आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – लोक आलोक

या दोन बातम्यांव्यतिरिक्त अनेकांनी फेसबुकवर याविषयी शेयर केलेल्या पोस्टदेखील आढळल्या. झारखंड दर्पन नावाच्या एका पेजने 5 जानेवारी 2019 रोजी या मूर्तींचे चार वेगवेगळे फोटो शेयर केले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता. उपरोक्त माहितीवरून सदरील फोटो झारखंडमध्ये असण्याची शक्यता आहे. या मूर्ती खरंच झारखंडच्या जिलिंगा गावात सापडल्याची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी आणखी तपास करण्याची गरज आहे.

वरील लेखातील माहिनीनुसार जिलिंगा गावाचा शोध घेतला. खुंटी जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट आणि व्हिलेज इन्फो वेबसाईटवरील माहितीनुसार, हे गाव झारखंडमधील खुंटी शहरापासून 11 किमी अंतरावर आहे. जवळच्याच भंडरा ग्राम पंचायतअंतर्गत हे गाव येते. 2011 सालच्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या केवळ 622 आहे. गावामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातीचे (70 टक्के) लोक राहतात. दुर्गम भागातील या गावात जाण्यासाठी सुमारे अडीच किमी अंतर जंगलातून पार करावे लागते. सामान्यपणे लोक पायीच गावातून ये-जा करतात. खाली दिलेल्या नकाशात हे गाव पाहू शकता.

मूर्तींची सत्यता जाणून घेण्यासाठी खुंटी ब्लॉक पोलीस ठाण्याशी संपर्क केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या विनंतीवरून तेथील पोलीस उपनिरीक्षक कुमार शंकर यांनी माहिती घेऊन जिलिंगा गावात मूर्ती सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या मूर्ती अद्यापही गावातच असल्याचे सांगितले. स्थानिक गटविकास अधिकारी (बीडीओ) सुचित्रा मिन्झ यांनीसुद्धा जिलिंगा गावात मूर्ती सापडल्याचे सांगितले.

भंडरा ग्राम पंचायतीमधील कर्मचारी दीपक सिंग यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातील जिलिंगा गावात गावकऱ्यांना या मूर्ती सापडल्या होत्या. माझ्यासह इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी गावाला भेट देऊन या मूर्ती पाहिल्या आहेत. त्यांनी सदरील फोटो जिलिंगा गावातीलच असल्याचे स्पष्ट केले.

फॅक्ट क्रेसेंडोने मग जिलिंग गावातील शंख्या मुंडा नामक व्यक्तीशी थेट संपर्क केला. ते मूर्ती सापडल्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्याने सांगितले की, इंद जत्रेची तयारी करत असताना एका मैदानात या मूर्ती आढळल्या होत्या. या मूर्ती जेथे मिळाल्या सध्या तेथेच ठेवण्यात आल्या असून, त्यावर बांबूचे शेड उभारण्यात आले आहे. विविध गावातील लोक या मूर्ती पाहण्यासाठी येथे येतात. खाली दिलेल्या फोटोमध्ये लाल वर्तुळात शंख्या मुंडा आणि पिवळ्या वर्तुळात सरपंच झिरगा मुंडा दिसत आहेत.

निष्कर्ष

इराकमध्ये सापडलेली रामाची मूर्ती म्हणून जो फोटो सोशल मीडियावर फिरवला जात आहे, तो मूळात झारखंडमधील जिलिंगा गावातील आहे. तेथील ग्रामस्थांना 4 जानेवारी 2019 रोजी या मूर्ती सापडल्या होत्या. फॅक्ट क्रेसेंडोने ग्रामस्थ, ग्राम पंचायत कर्मचारी, गटविकास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी संपर्क साधून फोटोची सत्यता तपासली. त्यांनी सदरील मूर्ती जिलिंगा गावातील असल्याचे सांगितले.

Avatar

Title:STATUE FACT: झारखंड येथील मूर्तीचे फोटो इराकमध्ये सापडलेली रामाची मूर्ती म्हणून व्हायरल

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False