मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

Missing Context राजकीय

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. 

या मेळाव्यातील शरद पवारांचे छायाचित्र वापरून सूचित केले जात आहे की, त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे वक्तव्य केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील विधान शरद पवार यांनी केले नव्हते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी असे म्हटले होते. 

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये ‘जय महाराष्ट्र’ चॅनलच्या बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या फोटोसोबत लिहिले आहे की, “पोटनिवडणुकीत मेलेल्यांचेही मतदान घडवा. संघाला हरवायला 100% मुसलमान मतदान करवा, मोदींना हरवायला प्रत्येक मुलमानाला मतदानाला आणा.” 

कॅप्शनमध्ये युजर्स लिहितात की, “आता तरी जागे होऊन हेमंत भाऊ रासने यांना मतदान करूयात.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलची बातमीची सखोल तपासणी केली. त्यातून कळाले की, व्हायरल होत असलेले विधान शरद पवारांनी केले नव्हते. मृत मुस्लिमांकडून मतदान करण्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी केले होते.

खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिरौली मेळाव्यामध्ये बोलत होते. 

टीव्ही-9 मराठीच्या बातमीनुसार, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कसब्यामध्ये आयोजित अल्पसंख्याक मेळाव्यात हिरौली म्हणाले होते की, “मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या. सौदी आणि दुबईला गेलेल्यांना बोलावून घ्या. त्यांना मतदान करायला सांगा. जोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करणार नाही. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करू शकत नाही.”

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या फेसबुक पेजवर या मेळाव्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. शरद पवार त्यावेळेस मंचावर उपस्थित होते. 

यामध्ये हिरौली म्हणतात की, “जे दुबई आणि सौदीला गेले असतील त्या सर्वांना बोलवा आणि सर्वांकडून मतदान करून घ्या. ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांनादेखील मतदानाला हजर करा. जोपर्यंत शंभर टक्के मतदान करणार नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) पराभूत करू शकत नाही.”

या विधानानंतर टीका होऊ लागल्यानंतर उस्मान हिरौली यांनी टीव्ही-9 मराठीशी बोलताना आपले म्हणणे स्पष्ट केले की, “कसबा मतदार संघातील जवळपास 1500 मुलं- मुली सौदी, दुबई, कुवेतमध्ये राहतात. 27 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना मतदानासाठी बोलून घ्या अस मी म्हणालो होतो.  या युवकांना मतदानासाठी प्रवृत्त करा असा संदेश मी दिला असून मतदानात वाढ व्हावी हाच माझा उद्देश आहे. तसेच ज्यांचे मन मेले आहे त्यांनीसुद्धा मतदान करावे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील विधान शरद पवार यांनी केले नव्हते. मृत मुस्लिमांकडून मतदान करून घेण्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी केले होते. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्टचेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Missing Context


Leave a Reply