CALENDAR FACTS: येत्या सप्टेंबर महिन्यात खरंच प्रत्येक वार चार वेळा येणार आहे का?

False आंतरराष्ट्रीय
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर येणारा सप्टेंबर महिना वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. व्हायरल मेसेजनुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात चार रविवार, चार सोमवार, चार मंगळवार, चार बुधवार, चार गुरुवार, चार शुक्रवार आणि चार शनिवार आहेत. असा योगायोग प्रत्येक 823 वर्षानंतर एकदाच येतो. फेंगशुई शास्त्रानुसार अशा महिन्याला धनाची पेटी म्हणतात. आपल्या आयुष्यात असा केवळ एकदाच येणार असल्याचे मेसेजमध्ये सांगण्यात येते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉटस्अ‍ॅपवर (9049043487) या मेसेजची पडताळणी करण्याची विनंती केली आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

व्हॉटस्अ‍ॅप मेसेज आणि फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेले आहे की, येणारा सप्टेंबर महिना म्हणजे

आपल्या जीवनात दुसऱ्यांदा न येणार वर्ष. कारण या वर्षात सप्टेंबर महिन्यांत चार रविवार, चार सोमवार, चार मंगलवार, चार बुधवार, चार गुरुवार, चार शुक्रवार आणि चार शनिवार. हे वर्ष प्रत्येक 823 वर्षानंतर एकदाच येते. “चायनिज फेंगशुई”नुसार सप्टेंबर महिन्याला “धनाची पेटी” म्हणुन संबोधतात.

तथ्य पडताळणी

या वर्षीचे सप्टेंबर महिन्याचे कॅलेंडर तपासल्यावर लक्षात येते की, व्हॉटस्अ‍ॅप मेसेजमधील माहिती चुकीची आहे. सप्टेंबर महिन्याच्या कॅलेंडरचा स्क्रीनशॉट खाली पाहा. यामध्ये स्पष्ट दिसते की, या महिन्यात पाच रविवार आणि पाच सोमवार आहेत. म्हणजे आठवड्यातील केवळ मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हेच दिवस चार वेळा येणार आहेत. सप्टेंबर महिना 30 दिवसांचा असतो. म्हणजे सगळे वार 4 वेळा रिपीट झाले तर 28 दिवसच होतात. दोन दिवस कायम शिल्लक राहणार.

मग आठवड्याचे सात वार कधी 4 वेळा रिपीट होतात का?

लीप-वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सगळे वार 4 वेळा येतात. कारण फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा (7 X 4 = 28) असतो. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सगळे वार 4 वेळा येणे ही फार विशेष बाब नाही.

823 वर्षांनी होणाऱ्या योगयोगांचे इतर दावे

सोशल मीडियावर यापूर्वीदेखील 823 वर्षांतून एकदाच होणाऱ्या योगायोगाचा मेसेज व्हायरल झाला होता. त्यानुसार, एका महिन्यात पाच शुक्रवार, पाच शनिवार, आणि पाच रविवार (पाच विकेंड) येण्याचा योगायोग 823 वर्षांतून एकदाच येतो. हा दावासुद्धा असत्य आहे.

टाईम अँड टेड वेबसाईटनुसार, कोणत्याही 31 दिवसांच्या महिन्याची पहिली (एक) तारीख शुक्रवारी असेल तर, त्या महिन्यात असे पाच शुक्रवार, पाच शनिवार आणि पाच रविवार येतात. यावर्षी मार्च (2019) महिन्यात असेच पाच विकेंड आले होते. कारण एक मार्च रोजी शुक्रवार होता. पुढील वर्षी मे 2020 महिन्यातसुद्धा पाच शुक्रवार, पाच शनिवार आणि पाच रविवार असतील.

मूळ आर्टिकल येथे पाहा – टाईम अँड डेटअर्काइव्ह

निष्कर्ष

येत्या सप्टेंबर महिन्यात प्रत्येक वार चार वेळा येणार असल्याचा दावा असत्य आहे. 30 दिवसांच्या महिन्यात असे होणे शक्यच नाही. केवळ फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चार वेळा रिपीट होतो.

Avatar

Title:CALENDAR FACTS: येत्या सप्टेंबर महिन्यात खरंच प्रत्येक वार चार वेळा येणार आहे का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •