बिकिनी घातलेल्या मुलीसोबत ट्रम्प नाहीत. हा त्यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. पाहा सत्य

False आंतरराष्ट्रीय राजकीय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ‘फादर ऑफ इंडिया’ उल्लेख केल्यानंतर यावरून टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा एका बिकिनी घातलेल्या युवतीसोबतचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. दावा केला जात आहे की, व्हिडियोमध्ये ट्रम्प या मुलीसोबत असभ्य वर्तन करत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भूतकाळ तसा कोणापासून लपलेला नाही. अमेरिकेच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्याआधीचे त्यांचे रंगीत आणि ग्लॅमरस आयुष्य प्रसिद्ध आहे. रिअल इस्टेट बिझनेसमन ते मिस युनिव्हर्स ते रिअ‍ॅलिटी टीव्ही शोपर्यंत सगळीकडे ट्रम्प यांचा वावर राहिलेला आहे. महिलांसोबतचे त्यांचे प्रेमसंबंधही छापून आलेले आहेत. त्यात काही नवीन नाही. त्यामुळे मग हा व्हिडियोसुद्धा खरं आहे का? फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

30 सेकंदाच्या व्हिडियो क्लिपमध्ये डोनाल्ड ट्रम्प सदृश्य व्यक्ती एका बिकिनी घातलेल्या एका मुलीला भर रस्त्यात स्पर्श करत आहे. सोबत लिहिले की, गांधीना राष्ट्रपिता सुभाषचंद्र बोस म्हणाले होते. आता मोदींना राष्ट्रपिता म्हणणाऱ्या जगाने ववाळून टाकलेल्या डोनाल्ड ट्रम्पची औकात पहा. आणि मोदींना राष्ट्रपती ठरवणारी दुसरी ती स्मृती इराणी. तिचा पण व्हिडीओ Coming Soon मध्ये आहे म्हणतात लोक! असले *** चाळे करणारे भारताचा राष्ट्रपिता ठरवणार का आता? कोणत्या लायनीत लावला देश आपला? मोदी भक्तांनो आत्मपरीक्षण करा! (सर्व महिला आणि भारतीय संस्कृतीची माफी मागून या मोदींच्या खाजगी याराचा व्हिडीओ पोस्ट करतोय, कारण यांची खरी लायकी देशवासियांना कळाली पाहिजे)

हा व्हिडियो फेसबुकवर मोठ्याप्रमाणावर शेयर होत आहे.

तथ्य पडताळणी

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी असे भर रस्त्यात उभे राहून मुलीसोबत व्हिडियो काढणे अतार्किक वाटते. म्हणून गुगलवर याबाबत सर्च केल्यावर कळाले की, व्हिडियोत दिसणारा व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प नाही. ट्रम्प यांच्यासारखा दिसणारा तो कलाकार आहे. त्यांचे नाव डेनिस अ‍ॅलन आहे. गेटी इमेजस या छायाचित्र पुरवठा संस्थेच्या वेबसाईटवर त्याचे अनेक फोटो आहेत. 

फोटो कॅप्शननुसार, ट्रम्प यांच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्यांचा निषेध करण्यासाठी लंडनच्या ट्रफाल्गर चौकात आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये ट्रम्प यांच्यासारखा दिसणाऱ्या डेनिस यांनी ट्रम्प यांच्यासारखी वेशभूषा आणि मेक-अप करून सहभाग घेतला होता. यावेळी एका बिकिनी घातलेल्या मुलीसोबत त्यांनी हा फोटो काढला होता.

मूळ फोटो येथे पाहा – Getty Images

कोण आहेत डेनिस अ‍ॅलन?

मेट्रो युके वेबसाईटनुसार, 68 वर्षीय डेनिस अ‍ॅलन निवृत्त शिक्षक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या दिसण्यामुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. सेलिब्रेटिंसारख्या दिसणाऱ्या सामान्य लोकांचे फोटो काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटिश छायाचित्रकार अ‍ॅलिसन जॅक्सन यांनी डेनिस यांना सर्वप्रथम ट्रम्प यांच्या अवतारात समोर आणले होते. आता तर त्यांना खोटे ट्रम्प बनून येण्यासाठी जगभरातून बोलावणे येते. दोघांमध्ये दिसण्यात इतके साम्य आहे की, अनेकदा लोक त्यांना खरोखरचे डोनाल्ड ट्रम्पच समजतात. जॅक्सन यांनी लंडनमध्ये जून महिन्यात झालेल्या कार्यक्रमातील फोटो शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. व्हायरल व्हिडियोमध्येसुद्धा तुम्ही जॅक्सन यांना पाहू शकता.

यापूर्वीसुद्धा केले होते आंदोलन

डेनिस आणि अ‍ॅलिसन यांनी 2016 मध्ये प्रेझिडेंट निवडणूकीआधी न्यूयॉर्क येथे ट्रम्प विरोधातील एका आंदोलनात सहभाग घेतला होता. तेव्हा देखील डेनिस यांनी ट्रम्प यांच्या वेशात बिकिनी घातलेल्या मुलींसोबत फोटोशूट केला होता. त्यावेळीसुद्धा हा स्टंट फार गाजला होता. महिलांविषयी केलेल्या अभद्र टिप्पणीचा निषेध म्हणून त्यांनी हे आंदोलन केले होते. त्याचा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, सदरील व्हिडियोमधील व्यक्ती खरे डोनाल्ड ट्रम्प नाहीत. तो ट्रम्प यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. त्यांचे नाव डेनिस अ‍ॅलन आहे. लंडनमध्ये 4 जून 2019 रोजी ट्रम्पविरोधातील आंदोलनादरम्यान हा व्हिडियो काढण्यात आला होता.

Avatar

Title:बिकिनी घातलेल्या मुलीसोबत ट्रम्प नाहीत. हा त्यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. पाहा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False