
भारत विश्वकप स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरदेखील देशात क्रिकेट फीव्हर कमी झाला नव्हता. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील चुरस तर कमालच होती. सुपर ओव्हरनंतरसुद्धा धावसंख्या समान राहिली आणि अधिक चौकारांच्या आधारे इंग्लंडने विश्वकप उंचावला. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडने वर्ल्डकपला गवसणी घातली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यांनी विश्वचषकादरम्यान नाचून जल्लोष केला, असा सोशल मीडियावर दावा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
विश्वचषकामधील कोणता सामना जिंकल्यानंतर RSS कार्यकर्त्यांनी असा नाचून जल्लोष केला, हे या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिलेले नाही. फोटोचे नीट निरीक्षण केले असता कळते की, हा फोटो इंडिया टीव्ही चॅनेलवरील बातमीचा स्क्रीनशॉट आहे. त्यानुसार इंडिया टीव्हीच्या वेबसाईटवर विश्वकपदरम्यान RSS कार्यकर्ते नाचल्याची बातमी शोधली. तशी बातमी आढळून आली नाही.
मग या फोटोची सत्यता पडताळून पाण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. यामधून इंडिया टीव्हीच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडियो समोर आला. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो संघाच्या नागपूर मुख्यालयातील 17 डिसेंबर 2015 रोजीचा आहे. स्वयंसेवकांच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्ग कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी हे कार्यकर्ते नाचत होते. देशभरातून 40 ते 65 वयोगटातील सुमारे 800 स्वयंसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यकर्त्यांनी गाण्यांवर ठेका धरला होता. दरम्यान, यावेळी संघ मुख्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्र्यांची बैठकदेखील सुरू होती.

आता फेसबुक पोस्टमधील फोटो आणि आणि मूळ व्हिडियोतील स्क्रीनशॉट यांची तुलना करू. यावरून स्पष्ट होते की, हा फोटो या व्हिडियोचा स्क्रीनशॉट आहे. म्हणजे हा फोटो 4 वर्षे जूना आहे. वर्ल्डकप 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान पार पडला. विशेष म्हणजे काही जणांनी हा व्हिडियो शेयर करून इंग्लंडच्या विजयाचा आनंदोत्सव साजरे करताना संघाचे कार्यकर्ते, असादेखील दावा केला आहे. तसेच, इंग्लंडच्या वर्ल्डकप विजयासाठी संघाच्या नागपूर मुख्यालयात यज्ञ करण्यात आल्याचीसुद्धा बातमी आली होती. फॅक्ट क्रेसेंडोने ती खोटी असल्याचे सिद्ध केले होते. त्याची फॅक्ट चेक येथे वाचा.

निष्कर्ष
सदरील फेसबुक पोस्टमध्ये जो फोटो शेयर केलेला आहे तो 4 वर्षे जूना आहे. संघाच्या कार्यकर्त्यांनी विश्वकप 2019 दरम्यान सामना जिंकल्यानंतर नाचून जल्लोष केला नव्हता. हा फोटो तृतीय वर्ष शिक्षा वर्ग कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी कार्यकर्ते नाचत असल्याचा आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:वर्ल्डकपमधील सामना जिंकल्यानंतर RSS कार्यकर्त्यांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
