ब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

False वैद्यकीय सामाजिक

वैद्यकीय विज्ञानाने केलेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्या जोरावर आज अनेक दुर्धर आजारांवर ईलाज शक्य आहे. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावरदेखील आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. परंतु, कॅन्सर पूर्णतः बरा करणारे औषध जर मिळाले तर किती बरे होईल ना! सोशल मीडियावरील एका व्हायरल मेसेजला खरे मानले तर तसे औषध तयार झाले आहे. या मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की, रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) बरा करणारे औषध सापडले आहे. एवढेच नाही तर पुणे येथील यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिकमध्ये ते विनामूल्य उपलब्ध आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवर खालील मेसेज फिरत आहे:

अत्यंत महत्वाची बातमी. पुणे येथे ब्लड कॅन्सरसाठी औषध सापडले आहे! कृपया फॉरवर्डिंगशिवाय हे काढून टाकू नका. हे भारतीय लोकांपर्यंत पोहोचायला पाहीजे. ‘इमिटिनेफ मर्सिलेटहे एक औषध आहे जे ब्लड कॅन्सर बरे करते. पुणे येथील यशोदा हेमॅटोलॉजी कर्करोग संस्थेमध्ये हे औषध विनामूल्य उपलब्ध आहे. हा मेसेज कोणाला तरी मदत करू शकतो.

सदरील मेसेजमध्ये दवाखान्याचे संपर्क क्रमांकदेखील दिलेले आहेत.

तथ्य पडताळणी

सदरील पोस्टमध्ये दोन दावे प्रामुख्याने करण्यात आले आहेत:

1. ‘इमिटिनेफ मर्सिलेट’ या औषधाने रक्ताचा कॅन्सर बरा होतो

2. ‘इमिटिनेफ मर्सिलेट’ हे औषध यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिकमध्ये मोफत मिळते

गुगलवर याचा शोध घेतला असता टाईम्स इंडियामध्ये 2015 साली प्रसिद्ध झालेली एक बातमी आढळली. बंगळुरू येथील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विशाल राव यांनी पत्रकार परिषेदत माहिती दिली होती की, सोशल मीडियावर ‘इमिटिनेफ मर्सिलेट’ नावाचे औषध सगळ्या कॅन्सरला बरे करू शकते असा मेसेज फिरत आहे. हे औषध पुण्यातील यशोदा हेमॅटॉलीजी कॅर्करोग संस्थेमध्ये मोफत मिळत असल्याचेही म्हटले जाते. परंतु, एकच औषध सगळ्या प्रकारचे कॅन्सर बरे करेल असा शोध अद्याप लागलेला नाही. सोशल मीडियावर अशा प्रकारची अफवा वाचून लोकांची फसवणुक होत आहे. सगळ्या प्रकराचे कॅन्सर बरे करणारे जादुई औषध अद्याप तयार झालेले नाही, असे ते म्हणाले.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

म्हणजे पुण्यातील यशोदा क्लिनिकविषयी गेल्या अनेक वर्षांपासून असा मेसेज फिरत आहे. मग मेसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन करून यशोदा हेमॅटोलॉजी कॅन्सर इन्स्टीट्यूटशी संपर्क केला. पुणे स्थित या हॉस्पीटलमध्ये कॅन्सरचा उपचार होतो. 

हॉस्पीटल प्रशासनाने सांगितले की, सोशल मीडियावर परसविला जाणारा हा मेसेज खोटा आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हा मेसेज फिरत असून, यशोदा हेमॅटोलॉजी कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्ये ‘इमिटिनफ मर्सिलेट’ हे औषध मोफत मिळत नाही.

मेसेजमध्ये डॉ. विजय रामणन यांचा क्रमांकही दिलेला आहे. ते रक्तदोष तज्ज्ञ (हेमॅटोलॉजिस्ट) आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी बोलणे झाल्यावर ही बातमी अपडेट करण्यात येईल.

यावरून हे तर कळाले की, पुण्यातील यशोदा हेमॅटोलॉजी क्लिनिकमध्ये ब्लड कॅन्सरवरील हे औषध मोफत दिले जात नाही. इंटरनेटवर आणखी शोध घेतला असता कळाले की, हा मेसेजे विविध हॉस्पीटलच्या नावे अगदी 2010 पासून फिरत आहे. चेन्नईतील अदयार कॅन्सर इन्स्टीट्यूटविषयीसुद्धा तो पसरला होता. एका ऑस्ट्रेलियन वेबसाईटला 2017 साली दिलेल्या माहितीनुसार, अदयार हॉस्पीटलमध्ये भरती झालेल्या ब्लड कॅन्सरच्या रुग्णांनाचा हॉस्पीटलतर्फे हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात येत असे. सगळ्यांना नाही.

काय आहे ‘इमिटिनेफ मर्सिलेट‘?

इमिटिनेफ मर्सिलेट (Imitinef Mercilet) हे रक्ताच्या कॅन्सरपीडितांसाठीचे एक औषध आहे. त्याला Imatinib Mesylate किंवा Gleevec  या नावानेही ओळखले जाते. हे औषध क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमिया (CML) व अक्युट लिम्फोसायटिक ल्युकेमिया (ALL) यासारख्या रक्ताच्या कॅन्सरसाठी वापरले जाते. अमिरेकेमध्ये हे औषध 2001 पासून वापरण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्येसुद्धा ‘इमिटिनेफ मर्सिलेट’चा समावेश आहे.

विविध कर्करोग तज्ज्ञांनी फॅक्ट क्रेसेंडोला माहिती दिली की, ब्लड कॅन्सरचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे त्या त्या प्रकारानुसार औषधोपचाराचा कोर्स ठरविण्यात येतो. ‘इमिटिनेफ मर्सिलेट’ हे औषध प्रामुख्याने क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमियासाठी (CML) वापरण्यात येते. CML कॅन्सरला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे प्रभावी औषध आहे. जसे ब्लड प्रेशर किंवा शुगरला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण गोळ्या घेतो, तशाच प्रकारे क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमियाचे रुग्ण हे औषध घेतात. त्याची बाजारात किंमत दीड ते दोन हजार रुपये आहे.

तज्ज्ञांनी फॅक्ट क्रेसेंडोला स्पष्ट सांगितले की, ‘इमिटिनेफ मर्सिलेट’ हे औषध ब्लड कॅन्सर बरे करते हा दावा चुकीचा आहे. हे औषध केवळ कॅन्सर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कॅन्सरच्या औषधोपचरातील तो एक घटक आहे. परंतु, सगळ्या प्रकारचे ब्लड कॅन्सर बरे करणारे औषध अद्याप तयार झालेले नाही.

निष्कर्ष

‘इमिटिनेफ मर्सिलेट’ हे ब्लड कॅन्सर पूर्णतः बरे करणारे औषध नाही. क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमिया (CML) या ब्लड कॅन्सरला नियंत्रित ठेवण्यासाठी हे औषध वापरण्यात येते. त्याची बाजारातील किंमत दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असते. यशोदा हेमॅटॉलॉजी कॅन्सर इन्स्टीट्यूमध्ये हे औषध मोफत दिले जात नाही. त्यामुळे हा मेसेज खोटा आहे.

Avatar

Title:ब्लड कॅन्सर बरे करणारे औषध पुण्यात मोफत मिळत असल्याचा मेसेज खोटा आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False