
रिझर्व्ह बँकेकडून सोनेविक्री दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सोनेसाठा विक्रीला, असे वृत्ताचे शीर्षक असलेले एक वृत्तपत्राचे एक कात्रण सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. Rajesh Ligade यांची ही मूळ पोस्ट Anil Analwar यांनी शेअर केली आहे. रिझर्व्ह बँकेने खरोखरच असे सोने विक्री काढले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे.
तथ्य पडताळणी
रिझर्व्ह बँकेकडून सोनेविक्रीचे हे वृत्त कोणत्या दैनिकाने दिले आहे, हे शोधण्याचा आम्ही सर्वप्रथम प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला दैनिक सकाळने हे वृत्त दिले असल्याचे आम्हाला दिसून आले.

या वृत्तानंतर आम्हाला दैनिक लोकसत्ताच्या संकेतस्थळाने 27 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटलं आहे की, तब्बल तीन दशकांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली असून बँकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचं वृत्त दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
“आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणतंही सोनं विकण्यात आलेलं नाही किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही”, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिलं. अशाप्रकारचं वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.

रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या विक्रीनंतर केलेले हे ट्विट आपण खाली पाहू शकता.
या सगळ्या संशोधनातून एक बाब स्पष्ट होते की, सोन्याच्या विक्रीची बाब रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नाकारली आहे.
निष्कर्ष
रिझर्व्ह बँकेने सोनेविक्रीची बाब स्पष्टपणे नाकारली आहे. त्यामुळे याबाबत करण्यात येत असलेले विविध दावे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळले आहेत.

Title:Fact : रिझर्व्ह बँकेने सोनेविक्रीस काढल्याचे वृत्त चुकीचे
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
