शरद पवारांनी झोपडीत जेवण करताना बियर घेतली का? वाचा त्या फोटोमागचे सत्य काय आहे…

False राजकीय | Political

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार एक फेब्रुवारी रोजी शहापूर तालुक्याच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी एका आदिवासी पाड्यातील झोपडीत जेवण केले. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केल्यानंतर याची बरीच चर्चा झाली.

मात्र, शरद पवार झोपडीत जेवत असताना त्यांच्या टेबलावर बियर बॉटल दिसत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. न्यूज मीडियाने ही बॉटल दाखविली नसल्याचा आरोपही या फोटोच्या माध्यमातून करण्यात आला. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली असता हा दावा खोटा (Fake) असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक | फेसबुक

तथ्य पडताळणी

शहापूर तालुक्यातील दौऱ्याचापाडा येथे कर्करोगाचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे विद्यासंकुलाचा भूमीपूजन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी वाऱ्याचा पाडा या आदिवासी पाड्यावर रामचंद्र खोडके यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स अशा अनेक दैनिकांनी ही बातमी प्रसिद्ध केली.

जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचा भोजनाचा अस्वाद घेत असतानाचा फोटो ट्विट केला होता.

वरील फोटोमध्ये कुठेही बियरची बॉटल दिसत नाही. एबीपी माझा आणि टीव्ही-9 मराठी वृत्तवाहिन्यांनी शरद पवार व जितेंद्र आव्हाड झोपडीत जेवत असतानाचा व्हिडियो प्रसारित केला होता. या व्हिडियोमध्येसुद्धा स्पष्ट दिसते की, पवारांच्या टेबलावर बियरची बॉटल नाही. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता. 

सदरील पोस्टमधील पोस्टला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, माजी खासदार व महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी हा फोटो ट्विट करीत पवारांवर टीका केली होती. त्यांनी लिहिले की, आव्हाड साहेब गरिबांचा घरी जेवण, कौतुक आहे. प्रश्न आहे डेकोरेटरची व्यवस्था, खुर्च्या, टिपोय, मिनरल वॉटर..

वरील फोटोमध्येसुद्धा बियरची बॉटल दिसत नाही. तसेच हा फोटो विविध ठिकाणीदेखील उपलब्ध आहे. आता मूळ फोटो आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो यांची तुलना करूया. त्यातून स्पष्ट होते की, मूळ फोटोशी छेडछाड करून त्यामध्ये बियरची बॉटल फोटोशॉप करून टाकण्यात आली आहे.

निष्कर्ष

शहापूर तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावरील झोपडीत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या जेवण करतानाच्या फोटोला खोडसाळपणे एडिट करून पसरविण्यात येत आहे. फोटोशॉपद्वारे त्यामध्ये बियरची बॉटल दाखविण्यात आली आहे. त्यामुळे सदरील पोस्ट खोटी आहे. तुमच्याकडेदेखील असे काही शंकास्पद फोटो किंवा व्हिडियो असतील त्यांची पडताळणी करण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवा.

Avatar

Title:शरद पवारांनी झोपडीत जेवण करताना बियर घेतली का? वाचा त्या फोटोमागचे सत्य काय आहे…

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False