मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य

False राजकीय | Political

दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी मतदान असून, शेवटच्या दिवसापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाची ‘तू तू मैं मैं’ सुरू आहे. ‘दिल्ली आम्हीच जिंकणार’ असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांनी लिहिलेले एक कथित पत्र गाजत आहे. 

या कथित पत्रात तिवारी यांनी पक्षाला स्पष्ट सांगितले आहे की, दिल्लीमध्ये ‘आप’चे सरकार येणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी (मोदी, शहा) निकालापूर्वी दिल्लीत न राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे पत्र खोटे (FAKE) असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

व्हायरल होत असलेल्या कथित पत्रात लिहिलेले आहे की, दिल्लीमध्ये भाजपने पूर्ण जोर लावला परंतु, अरविंद केजरीवाल पुन्हा निवडूण येणार असे अंतर्गत सर्वेक्षणात दिसून येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना निकालापूर्वी दूर न्यावे, जेणेकरून या पराभवाचे खापर त्यांच्यावर फुटू नये. (मराठी भाषांतर)

मनोज तिवारी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना हे पत्र लिहिल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या पत्राचे नीट वाचन केल्यावर लक्षात येते की, जे. पी. नड्डा यांचा नामोल्लेख करताना त्यात ‘दिल्ली’ लिहिलेले नाही. तसेच सदरील पत्र जर भाजपच्या अधिकृत लेटरहेड वरील आहे तर कार्यालयाचा पत्तादेखील नाही. 

मनोज तिवारींनी जर खरंच असे काही पत्र लिहिले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, गुगलवर शोध घेतल्यावर अशी कोणतीही बातमी आढळली नाही. त्यामुळे या पत्राच्या सत्येतेबाबत शंका निर्माण होते.

मग हे सत्य आहे आहे की नाही हे कसे कळणार?

त्यासाठी मनोज तिवारी यांनी लिहिलेल्या खऱ्याखुऱ्या पत्राशी याची तुलना केली तर त्याची वैधता सिद्ध होऊ शकते. त्यानुसार शोध घेतला असता मनोज तिवारी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून बालदिनाची (14 नोव्हेंबर) तारीख बदलण्याची मागणी केली होती, अशी ‘आज तक’ने दिलेली बातमी आढळली. या बातमीत मनोज तिवारी यांच्या अधिकृत पत्राचे छायाचित्र दिले आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ बातमी येथे वाचा – आज तकअर्काइव्ह

वरील पत्रामध्ये स्पष्ट दिसते की:

1. कमळाचा लोगो पांढऱ्या रंगाचा आहे. (व्हायरल पत्रात तो केशरी रंगात आहे)

2. भारतीय जनता पार्टी, दिल्ली प्रदेश असे हिंदी व इंग्रजी भाषेत लिहिलेले आहे (व्हायरल पत्रात केवळ हिंदीत लिहिलेले आहे)

3. पत्र ज्यांना लिहिले त्यांच्या शहराचा (दिल्ली) उल्लेख केलेला आहे. (व्हायरल पत्रात तो नाही)

4. मनोज तिवारी यांचे पद – अध्यक्ष, दिल्ली भाजपा असे दिले आहे. (व्हायरल पत्रात ते – भारतीय जनात पार्टी दिल्ली प्रदेश अध्यक्ष – असे लिहेलेले आहे)

5.  पत्राच्या शेवटी कार्यलयाचा पत्ता दिलेला आहे. (व्हायरल पत्रात तो नाही)

यावरून कळते की, व्हायरल होत असलेले पत्र बनावट आहे.

अधिक माहिती घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने भाजपच्या सोशल मीडिया संयोजक नीलकंठ बख्शी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे पत्र खोटे असल्याचे सांगितले. “भाजपच्या अधिकृत लेटरहेडवर कमळाचा लोगा पांढऱ्या रंगाचा असतो. हा बदल 2014 पासून करण्यात आलेला आहे. तसेच पत्राचे वाचन केल्यावर कळेल की, त्यामध्ये अनेक विसंगती आहेत. आमच्या पक्षाने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारदेखील केलेली असून, लोकांनी या पत्रावर विश्वास ठेवू नये.”

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनीदेखील दैनिक भास्करशी बोलताना हे पत्र बनावट असल्याचे सांगितले. न्यूज नेशन चॅनेलनेदेखील याविषयी बातमी देत भाजप या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, मनोज तिवारी यांच्या नावे फिरणारे हे पत्र बनावट आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचा विजय होणार असल्याचे त्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहिलेले नाही. 

Avatar

Title:मनोज तिवारी यांनी दिल्लीमध्ये ‘आप’ जिंकणार असल्याचे पक्षाला पत्र लिहिले का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False