स्टेजवर उभे न राहू दिल्याने दलित बॉडीबिल्डर पुरस्काराला लाथ मारून निघून गेला का? वाचा सत्य

False Social

सोशल मीडियावर सध्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील एक विजेता पुरस्काराला लाथ मारून कार्यक्रमातून निघून जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा विजेता दलित असल्यामुळे त्याला स्टेजवर कोपऱ्यात उभे राहण्यासा सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने पुरस्कार फेकून निषेध व्यक्त केला. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ बांग्लादेशमधील असून स्पर्धेत प्रथम क्रमांक न मिळाल्यामुळे नाराज होऊन या बॉडीबिल्डरने असा राग व्यक्त केला होता.

काय आहे दावा ?

शरीरसौष्ठव स्पर्धेच्या स्टेजवरून पुरस्काराला लाथ मारून निघून जाणाऱ्या एका शरीरसौष्ठवपटुचा व्हडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, “टेलेंट कितीपण असो ओळख जातीनेच केली जाईल, मुलाने आपला स्वाभिमान सोबत कोणतीही तडजोड केली नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी 

व्हायरल व्हिडिओमधील मंचावर “We are IFBB” असे लिहिलेले आहे. याबद्दल सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ बांग्लादेश बॉडीबिल्डींग फेडरेशनतर्फे 23 डिसेंबर 2022 आयोजित स्पर्धेतील आहे. 

बांग्लादेश बॉडीबिल्डींग फेडरेशनच्या युट्युब चॅनेलवर या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यानुसार, या स्पर्धकाचे नाव जाहिद हसन असे आहे. त्याने सुमारे अडीच लाख टाका (बांग्लादेशी रुपये) खर्च करून या स्पर्धेची तयारी केली होती. परंतु, अंतिम फेरीत त्याची उपविजेता म्हणून निवड झाल्यामुळे तो नाराज झाला. रागाच्याभरात त्याने पुरस्कार आणि भेटवस्तूला स्टेजवरूनच लाथ मारत फेकून दिले. 

वरील व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, हसनला पदक दिल्यानंतर त्याला इतर विजेत्यांसोबत उभे राहण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे त्याला दलित असल्यामुळे स्टेजवर कोपऱ्यात करण्यात आल्याचा दावा असत्य आहे. 

या प्रकारानंतर बांग्लादेश बॉडीबिल्डींग फेडरेशनने पत्रक काढून माहिती दिली की, हसनवर स्पर्धेत भाग घेण्यापासून आजीवन बंदी घालण्यात आली. तसेच हसनचे आरोप फेटाळत महासंघाने स्पष्ट केले की, स्पर्धेचा निकाल निःपक्षपातीपणे लावण्यात आला होता. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेता दलित असल्यामुळे त्याला बाजूला उभे राहण्यास सांगण्यात आले नव्हते. हा व्हिडिओ बांग्लादेशमधील आहे. विजेता म्हणून निवड न झाल्यामुळे नाराज झालेल्या जाहिद हसनने पुरस्कार फेकून राग व्यक्त केला होता. 

Avatar

Title:स्टेजवर उभे न राहू दिल्याने दलित बॉडीबिल्डर पुरस्काराला लाथ मारून निघून गेला का? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: False