FACT CHECK: अभाविपने CAA/NRC विरोधात प्रदर्शन केले का? विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

False राजकीय | Political

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात एकीकडे प्रदर्शने सुरू आहेत तर, दुसरीकडे समर्थनार्थदेखील मोर्चे निघत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक लक्ष वेधून घेणारा फोटो शेयर करण्यता येत आहे. यामध्ये भाजपाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP)  कार्यकर्ते या नव्या कायद्याविरोधात प्रदर्शन करताना दिसतात. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेले कथित बॅनरदेखील ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी झळवल्याचे फोटोत दिसते.

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर होणाऱ्या फोटोत आसाममधील ‘अभाविप’चे कार्यकर्ते CAA आणि NRC विरोधातील बॅनरसह घोषणा देताना दिसतात. बॅनरवर मोदी व शहा यांचे फोटो असून सोबत लिहिले की, “We Don’t Support NRC, CAB, CAA. Modi Go Back, Takla Amit Go Back. #ABVPAssam”

मग भाजपशी संलग्न असूनही ‘अभाविप’ने CAA/NRC ला विरोधात केले का? फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील फोटोची सत्यता तपासण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता खरं काही वेगळेच असल्याचे समोर आले. हा फोटो खोडसाळपणे एडिट करून चुकीच्या पद्धतीने पसरविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

अहमदाबाद मिरर वेबसाईटवरील बातमीनुसार, 18 डिसेंबर 2019 रोजी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाबाहेर ‘अभाविप’चे सुमारे 500 कार्यकर्ते CAA/NRC च्या समर्थनार्थत जमा झाले होते. CAA कायद्याला विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. बातमीत दिलेल्या फोटोत स्पष्ट दिसते की, बॅनरवर CAA/NRC ला समर्थनार्थ – We  Support CAA – असे लिहिण्यात आलेले आहे. 

मूळ बातमी येथे वाचू शकता – अहमदाबाद मिररअर्काइव्ह

बातमीत ‘अभाविप’चे गुजरात (राज्य) सचिव निखिल मेथिया यांचे नाव आहे. वरील फोटोत डाव्याबाजूने दुसऱ्या क्रमांकावर निळ्या रंगाच्या शर्टमध्ये मेथिया उभे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोशल मीडियावरील ‘अभाविप’चा CAA-विरोधातील फोटो खोटा असल्याचे सांगितले. 

“अभाविपला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे फोटोशॉप केलेले छायाचित्र पसरवून दुष्प्रचार केला जात आहे. लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. आम्ही CAA समर्थन देण्यासाठी अहमदाबादमध्ये ही रॅली काढली होती,” असे मेथिया म्हणाले. या मोर्चाच्या व्हिडियो येथे पाहू शकता.

सोशल मीडियावरील फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना केल्यावर लक्षात येते की, फोटोला खोडसाळपणे एडिट करण्यात आले आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या मल्याळम आणि हिंदी टीमने यापूर्वी याचे फॅक्ट चेक केलेले आहे.

निष्कर्ष

आसाममध्ये ‘अभाविप’ने CAA/NRC ला विरोध केला असल्याचा दावा खोटा आहे. सदरील फोटो गुजरातमध्ये ‘अभाविप’तर्फे CAA/NRC समर्थनार्थ काढलेल्या रॅलीतील आहे. या फोटोला एडिट करून ‘अभाविप’ CAA/NRC च्या विरोधात असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Avatar

Title:FACT CHECK: अभाविपने CAA/NRC विरोधात प्रदर्शन केले का? विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False