हा स्वामी समर्थांचा फोटो नाही. हे भगवान नित्यानंद स्वामी आहेत. वाचा सत्य

False सामाजिक

अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा भक्त परिवार खूप मोठा आहे. आपल्या श्रद्धेय गुरुविषयी आदर आणि भक्ती म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो शेयर केले जातात. असाच एक कृष्णधवल फोटो स्वामी समर्थांचा ओरिजनल फोटो म्हणून सोशल मीडियावर पसरविला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा फोटो स्वामी समर्थांचा नसल्याचे समोर आले.

काय आहे फोटोत?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

स्वामी समर्थांचा खरा फोटो म्हणून यापूर्वीदेखील अनेक वेळा खोटे दावे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या फोटोची सत्यता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो गणेशपुरी येथील भगवान नित्यानंद यांचा आहे.

भारतीय अध्यात्मिक वस्तुंची विक्री करणाऱ्या Ma’s India Spiritual Giftstore नावाच्या वेबसाईटवर हा फोटो विक्रीसाठी उपलब्ध आहे. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो भगवान नित्यानंदांचा आहे. या वेबसाईटवर नित्यानंदांचे अनेक फोटो विक्रीला आहेत.

मूळ वेबसाईट येथे पाहा – Ma’s India Spiritual Giftstore

याविषयी अधिक माहिती घेतल्यावर नावाच्या Sadguru Nityananda वेबसाईटवरदेखील भगवान नित्यानंदांचे वेगवेगळे फोटो असल्याचे आढळले. या वेबसाईटवरील माहितीनुसार, एम. डी. सुवर्णा नावाच्या छायाचित्रकारने हे फोटो काढलेले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने सुवर्णा यांचे पुत्र निरंजन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो भगवान नित्यानंदांचा आहे. तो स्वामी समर्थांचा नाही.

मूळ फोटो येथे पाहा – Sadguru Nityananda

कोण होते भगवान नित्यानंद?

नित्यानंदांचा जन्म केरळमध्ये झाला होता. त्यांच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी, असे मानले जाते की, एका गरीब शेतकरी जोडप्याला जंगालात एक बाळ सापडले होते. जोडप्याने मग त्याचे नाव रमण असे ठेवले. नंतर दोहोंचा मृत्यू झाल्यानंतर ईश्वर अय्यर नावाच्या वकिलाने रमणचा सांभाळ केला. वयाच्या दहाव्या वर्षी बालरमण घर सोडून अध्यात्माच्या शोधात निघाले. पुढे 1936 साली ते मुंबईपासून 80 किमी अंतरावरील गणेशपुरी गावात येऊन स्थायिक झाले. येथे आजन्म त्यांचे वास्तव्य राहिले. 8 ऑगस्ट 1961 साली रोजी ते समाधीस्थ झाले. गणेशपुरी येथे नित्यानंद स्वामींचे मंदिर व समाधीस्थळ आहे. अधिक सविस्तर येथे, येथे आणि येथे वाचा.

एम. डी. सुवर्णा कोण होते?

एम. डी. सुवर्णा हे भगवान नित्यानंद स्वामींचे अधिकृत फोटोग्राफर होते. तत्पूर्वी ते इल्युस्ट्रेड विकली मासिकाचे छायाचित्रकार होते. 1954 साली ते नित्यानंदांच्या संपर्कात आले होते. नित्यानंदांचे निस्सिम भक्त असणाऱ्या एम. डी. सुवर्णा यांनी नित्यानंदांच्या समाधी घेण्यापर्यंत हजारो फोटो काढलेले आहेत. आता त्यांचे पुत्र निरंजण हे वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांचा मुंबईत फोटो कॉर्नर म्हणून व्यवसाय आहे. नुकतेच त्यांनी नित्यानंदांवर तीन तासांचा माहितीपट तयार केला होता.

मूळ माहिती येथे वाचा – Nityananda Tradition | Sadguru Nityananda

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो स्वामी समर्थांचा नाही. तो फोटो भगवान नित्यानंद स्वामींचा आहे. त्यामुळे सदरील पोस्टमधील दावा खोटा ठरतो.

Avatar

Title:हा स्वामी समर्थांचा फोटो नाही. हे भगवान नित्यानंद स्वामी आहेत. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False