मुंबईतील लॉकडाऊनबाबत नवीन वेळापत्रक लागू झाल्याचा ‘तो’ मेसेज फेक; वाचा सत्य

Coronavirus False

मुंबई महानगरपालिकेने 1 मेपासून लॉकडाऊनसंबंधी नवे वेळापत्रक लागू केल्याचा एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये विविध अत्यावश्यक सुविधा सुरू राहण्याचा कालावधी कसा असेल याची माहिती दिलेली आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले हे वेळापत्रक खोटे आहे. मुंबई महानगरपालिकेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

काय आहे दावा?

मुंबई महानगरपालिकेचा (बीएमसी) लोगो असलेले एक पत्रक सोशल मीडियावर शेअर होत आहे. 1 मेपासून मुंबईत लॉकडाऊन काळात गॅस, स्टेशनरी शॉप, मेडिकल, किराणा, भाजीपाला आणि इतर दैनंदिन उपयोगाची दुकाने कोणत्या वेळेदरम्यान सुरू राहतील याचे वेळापत्रक दिलेले आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर सर्च केल्यावर या नवीन वेळापत्रकाविषयी कोणतीही अधिकृत बातमी आढळली नाही. त्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरदेखील तपासणी केली. तेथेदेखील सदरील व्हायरल वेळापत्रक आढळले नाही. 

खातरजमा करून घेण्यासाठी आम्ही महापालिकेचे उपजनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल मेसेज खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.

“मुंबई महानगरपालिकेने असे कोणतेही निर्देश जारी केलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले वेळापत्रक बनावट असून, लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. संपूर्ण राज्यात 1 ते 15 मे दरम्यान जे कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत, तेच निर्बंध मुंबईतही लागू आहेत,” असे कांबळे म्हणाले.

एवढेच नाही तर त्यांनी हेदेखील सांगितले की, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनसुद्धा या व्हायरल मेसेजबाबत खुलासा करण्यात आलेला आहे.

बीएमसीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सदरील व्हायरल वेळापत्रक फेक आहे. बीएमसीने असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत. राज्याप्रमाणेच मुंबईतदेखील निर्बंध लागू असतील. नागरिकांनी अशा फेक मेसेजवर विश्वास ठेवू नये तसेच ते इतरांशी शेअरदेखील न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.”

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मुंबईत 1 मेपासून लॉकडाऊनसंबंधी नवे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. सोशल मीडियावरील तो वेळापत्रकाचा मेसेज फेक आहे. 

आपल्याकडेदेखील असे संशयास्पद मेसेज असतील सत्य जाणून घेण्यासाठी ते आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवा.

Avatar

Title:मुंबईतील लॉकडाऊनबाबत नवीन वेळापत्रक लागू झाल्याचा ‘तो’ मेसेज फेक; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False