आंदोलनात जखमी झालेला तो शेतकरी आर्मी ऑफिसर पीपीएस ढिल्लन नाहीत; वाचा सत्य

False राजकीय

नव्या कृषी कायद्याविरोधात हजारो शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत. आंदोलकांना राजधानीत येऊ न देण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा व लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक शेतकरी जखमी झाले. जबर मार बसलेल्या अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

अशाच एका जखमी बुजूर्ग शेतकऱ्याच्या फोटोसोबत दावा केला जात आहे की, ते निवृत्त आर्मी अधिकारी पी.पी.एस. ढिल्लन आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी तो फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून ते खरंच पी.पी.एस. ढिल्लन आहेत का हे तपासण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, सोशल मीडियावरील दावा खोटा आहे.

काय आहे दावा?

सोशल मीडियावर डोळ्यावर पट्टी बांधलेल्या एका शीख व्यक्तीचा आणि एका आर्मी ऑफिसरच्या वाढदिवसाचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, दोन्ही फोटो एकाच माणसाचे आहेत. जवान पण आणि किसान पण. पी. पी. एस ढिल्लोंअसे यांचे नाव आहे, IT cell वाल्यांसाठी हे खलिस्तानी आहेत.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हे दोन्ही फोटो नेमके कोणाचे आहेत ते शोधणे गरजेचे आहे. आर्मी ऑफिसरचा फोटो रिव्हर्स इमेज केल्यावर शीख मिलिटरी हिस्ट्री फोरम नामक फेसबुक ग्रुपवर हा फोटो आढळला.

सुखविंदर सिंग नामक व्यक्तीने हा फोटो शेयर करीत म्हटले की, “आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. कॅप्टन प्रीतीपाल सिंग ढिल्लन 17व्या शीख रेजिमेंटमधून 1993 साली निवृत्त झाले होते. त्यांनी पाकिस्तान (1965), बांग्लादेश (1971) आणि श्रीलंकेतील (1990) युद्धात कार्य बजावलेले आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने मग सुखविंदर सिंग यांच्याशी संपर्क साधला. ते उबोके गावाचे सरपंच आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, वाढदिवस साजरा करणारे आर्मी ऑफिसर त्यांचे वडिल आहेत; पण जखमी झालेल्या शेतकऱ्याचा तो फोटो त्यांच्या वडिलांचा नाही.

“व्हायरल होत असलेल्या फोटोंसोबत केला जाणारा दावा पूर्णतः खोटा आहे. माझे वडिल घरीच असून, ते दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. जखमी झालेला तो शेतकरी वेगळा माणूस आहे. ते दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचे नाहीत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मी त्या बुजूर्ग शेतकऱ्याच्या नातवाशीसुद्धा संपर्क केला,” असे ते म्हणाले.

मग ते जखमी शेतकरी कोण आहेत?

जखमी शेतकऱ्याचे नाव एस. बलवंत सिंग ओटल आहे. फॅक्ट क्रेसेंडोने त्यांचे नातू तेजपाल सिंग ओटल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, डोळ्यावर पट्टी बांधलेले त्यांचे आजोबा आहेत. 

“माझे आजोबा शेती करतात. ते सैन्यात नव्हते. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन ते आणि मी सहभागी झालो आहोत. हरियाणा आणि पंजाबच्या शंभू सीमेवर पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत आजोबा जखमी झाले. त्यांच्या डोळ्यावर टाके द्यावे लागले. आता त्यांना मी घरी गावाकडे पाठविले आहे. सोशल मीडियावर त्यांचा फोटो आर्मी ऑफिसर ढिल्लन म्हणून व्हायरल होत आहे. ते चुकीचे आहे,” असे तेजपाल सिंग यांनी सांगितले.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचे नाहीत. जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव बलवंत सिंग ओटल आहे. ते निवृत्त ऑर्मी ऑफिसर पी.पी.एस. ढिल्लन नाहीत. 

Avatar

Title:आंदोलनात जखमी झालेला तो शेतकरी आर्मी ऑफिसर पीपीएस ढिल्लन नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False