सैनिकांशी हुज्जत घालणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ नागालँडमधील नाही; तो तर आहे कोलंबियातील

False राष्ट्रीय

भारतीय सैन्याच्या एका गस्ती पथकाने 4 डिसेंबर रोजी नागालँडमध्ये मजुरांच्या एका गटावर केलेला गोळीबार आणि त्यानंतर सामान्य नागरिक व सैन्यात झालेल्या झटापटीत 13 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. सैन्याने हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते; पण स्थानिक नागरिकांनी सैन्याचा हा दावा फेटाळून लावला होता.

यानंतर सोशल मीडियावर सैनिक आणि सामान्य लोक यांचा शेतात हुज्जत घालतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, नागालँडमधील गावकऱ्यांनी आधी सैनिकांशी भांडण करीत त्यांच्या बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न केला. म्हणून सैनिकांनी आधी चेतावणी दिली आणि नंतर पर्याय न राहिल्याने गोळीबार केला.

परंतु, हा दावा असत्य आहे. हा व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही. हा व्हिडिओ कोलंबिया देशातील आहे. 

काय आहे दावा?

सैनिक आणि सामान्य नागारिकांचा भांडतानाचा व्हिडिओ शेअर करून लिहिले की, “नागालँड गोळीबार सत्यता. सैनिकांनी गावकऱ्यांना आधी चेतावणी दिली, चेतावणी न देता गोळीबार केला नाही. विडीओमध्ये पाहू शकता एक तरूण सैनिकाच्या हातातली बंदुक हिसकावून घेऊ पाहतोय, अशा परिस्थितीत सैनिक गोळीबार करणं साहजिकच आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

सत्य पडताळणी

सर्वप्रथम तर या व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेस सर्च केले. त्यातून हा व्हिडिओ 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे समोर आले. 7 जानेवारी 2018 रोजी अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिचे शीर्षक आहे की, कोलंबियन सैनिकांवर मूलनिवासी नागरिकांनी हल्ला केला.

हा धागा पकडून अधिक शोध घेतला. या व्हिडिओसंदर्भात एका न्यूज आढळली. त्यानुसार हा व्हिडिओ कोलंबिया येथील Corinto, Cauca या ठिकाणी तेथील स्थानिक नागरिकांचे सैनिकांसोबत वाद झाला होता. 

साखरेच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या ताब्यातील उसाच्यां शेतमळ्यांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणारे स्थानिक आंदोलनकर्ते आणि सैनिक यांच्यातील ही झटापट आहे.

कोलंबियातील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोरिंटो नामक ग्रामिण भागात 5 जानेवारी रोजी हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. सैन्याने माहिती दिली होती की, सुमारे 50 मूलनिवासी नागरिकांनी सैनिकांवर कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांसह चालून आले होते. त्यांना चेतावणी म्हणून सैनिकांनी जमिनीवर गोळीबार केला होता. 

मूळ बातमी – Caracol TV

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सदरील व्हिडिओ नागालँडच नाही तर, भारतातीलसुद्धा नाही. हा व्हिडिओ कोलंबियातील आहे. त्यामुळे व्हायरल दावा असत्य ठरतो.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सैनिकांशी हुज्जत घालणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ नागालँडमधील नाही; तो तर आहे कोलंबियातील

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False