
सोशल मीडियावर तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडियो पुन्हा फिरू लागला आहे. या व्हिडियोमध्ये पोलीस भर रस्त्यात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करताना दिसतात. पोलिसच नाही तर साध्या कपड्यातील काही जणदेखील विद्यार्थ्यांवर हात उचलत आहेत. मुले तर मुले, विद्यार्थिनींनासुद्धा मारहाण झाल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. हा व्हिडियो शेयर करून दावा करण्यात येत आहे की, दिल्लीमध्ये मराठी विद्यार्थ्यांना अशाप्रकारे अमानुष मारहाण झाली होती. यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्यता पडताळणी केली.
मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
एका फेसबुक युजरने 9 फेब्रुवारी 2017 रोजी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडियो 24 जून 2019 रोजी शेयर केला आहे. या 40 सेंकदाच्या क्लिपमध्ये पोलीस काठ्या आणि हातापायांनी मारताना दिसतात. पोलीस बळाचा वापर करू लागताच विद्यार्थी पळू लागले. पण पोलिसांनी मागे धावत त्यांना काठ्यांनी मारहाण केली. साध्या वेशातील लोकांनीसुद्धा या विद्यार्थ्यांना मारले. “का मारत आहात” असे विचारणाऱ्या मुलींनासुद्धा मारहाण झालेली या व्हिडियोमध्ये दिसते. मूळ पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, “अखेर तो व्हिडियो हाती लागला. दिल्लीमध्ये झालेली मराठी मुलांना अमानुष मारहाण. जाहीर निषेध”. युजरने त्यावर लिहिले की, “राज्यात भगिनिंवरही हात उचलले गेले, तरी हे निवडणुका जिंकतात हे दुर्दैव आहे.“
तथ्य पडताळणी
व्हिडियोची सत्यता तपासण्यासाठी आम्ही गुगलवर – Delhi Police Lathicharge On Student – असे सर्च केले. त्यातून इंडिया टीव्हीच्या युट्युब चॅनेलवर 1 फेब्रुवारी 2016 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता. या न्यूज रिपोर्टनुसार, हैदराबाद येथील विद्यार्थी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी 30 जानेवारी 2016 रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालया बाहेर प्रदर्शन करीत होते. त्यावेळी पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. याचा व्हिडियो दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद उसळला होता. याविषयी अधिक एनडीटीव्ही येथे पाहा.
या घटनेच्या बातम्या मीडियामध्ये प्रचंड गाजल्या होत्या. दिव्य मराठीच्या बातमीनुसार, संघाच्या मुख्यालयाबाहेर 30 जानेवारी 2016 रोजी निदर्शने करणारे आंदोलक आणि महिला कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहुबाजूंनी टीका होत आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या निषेधार्थ हे विद्यार्थी निदर्शने करीत होते. विद्यार्थ्यांनी आरोप केला होता की, शांततापूर्ण आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी सांगितले होते की, विद्यार्थ्यांनी सुरक्षा बॅरिकेड्स तोडून पोलिसांना कडक कारवाईस भाग पाडले. यावेळी पत्रकारांनासुद्धा मारहाण झाली. एनडीटीव्ही, फर्स्टपोस्ट, हिंदुस्थान टाईम्स आणि लोकसत्ता येथे या बातम्या वाचू शकता.

मूळ बातमी येथे वाचा – दिव्य मराठी । अर्काइव्ह
मग दिल्लीत मराठी मुलांना कोणी मारहाण केली?
रेल्वेत नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या मराठी मुला-मुलींवर 31 जानेवारी 2017 रोजी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. रेल्वे अॅप्रेंटिसच्या मुलांना रेल्वेत सामावून घेण्यासाठी दिल्ली येथील रेल्वे मुख्यालयाबाहेर देशभरातील दहा हजार विद्यार्थी आंदोलन करीत होते. त्यांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. झी-24 तासच्या बातमीनुसार, “मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्या. महाराष्ट्रातील दीड हजार मुलानी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर या सर्व मुलामुलींना संसद मार्ग पोलीस ठाण्यात डांबण्यात आले.”

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स
निष्कर्ष
सदरील व्हिडियो 2016 मध्ये रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी संघाच्या कार्यालयाबाहेर प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा आहे. नोकरीसाठी रेल्वे मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या मराठी मुलांना 2017 मध्ये दिल्ली पोलिसांनी मारहाण केली होती. या दोन्ही घटना एक वर्षांच्या अंतराने घडल्या होत्या. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.
Title:VIDEO: तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडियो दिल्लीत मराठी मुलांना झालेल्या मारहाणीचा नाही. वाचा सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False


