
भारताच्या हवाई दलात नुकतेच 5 राफेल युद्धविमानांचे आगमन झाले. फ्रान्स येथून उड्डाण भरल्यानंतर भारताच्या अंबाल विमानतळावर या विमानांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, प्रवासामध्ये या विमानांत 30 हजार फुटांवर हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले होते. या प्रसंगाचा व्हिडियो म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही क्लिप राफेल विमानांची नसल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?
सुमारे 12 सेकंदाच्या या क्लिपमध्ये विमानात हवेतल्या हवेत इंधन भरण्यात येत असल्याचे दिसते. अनेकांनी हा व्हिडियो राफेल विमानांचा म्हणून शेयर केला. दैनिक गोमंतकने तर हा व्हिडियो भारतीय हवाई दलाने जारी केल्याचे म्हटले आहे.
परंतु, सत्य वेगळेच आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम भारतीय हवाईदल्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडियो शोधला असता तो आढळला नाही. त्यामुळे या व्हिडियोबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्याविषयी शंका वाढली.
मग गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडियो दोन वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. तसेच तो राफेल विमानांचा नसून, ब्राझीलच्या विमानांचा आहे.
ब्राझीलच्या हवाई दलाने हा व्हिडियो 28 सप्टेंबर 2018 रोजी ट्विटरवर शेयर केला होता. सोबत लिहिले होते की, ब्राझील हवाई दलाच्या एफ-5 जेट विमानाने ब्राझीलच्या नौदलातील ए-4 फायटर जेटमध्ये हवेतल्या हवेत इंधन भरतानाचा हा व्हिडियो आहे.
म्हणजे हा व्हिडियो राफेलचा नाही.
मग राफेलमध्ये 30 हजार फुटांवर इंधन भरले होते का?
हो. फ्रान्स ते भारत प्रवासादरम्यान राफेल विमानांत हवेतल्या हवेत इंधन भरण्यात आले होते. फ्रान्समधील भारतीय दुतावासाने ट्विट करीत ही माहिती दिली होती. सोबत राफेलमध्ये इंधन भरतानाचे फोटोसुद्धा शेयर केले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता.
भारतीय हवाई दलानेसुद्धा राफेलमध्ये हवेत इंधन भरतेवेळीचे फोटो शेयर केले होते. सोबत म्हटले की, राफेल विमानांना भारतामध्ये आणण्यात फ्रान्सने केलेले सहकार्य प्रशंसनीय आहे.
निष्कर्ष
राफेल विमानांमध्ये 30 हजार फुटांवर हवेतल्या हवेत इंधन भरतानाचा म्हणून जी क्लिप शेयर केली जात आहे तो ब्राझीलच्या युद्धविमानांचा दोन वर्षे जुना व्हिडियो आहे.

Title:ब्राझीलच्या विमानामध्ये हवेत इंधन भरण्याचा जुना व्हिडियो राफेलच्या नावे व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
