श्रीनगरमधील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा हटविण्यात आला का? वाचा सत्य

False राजकीय

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त करून देणारे  ‘आर्टिकल 370’ रद्द झाल्यानंतर तेथील अनेक घटनांविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे श्रीनगर येथील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा उतरविण्यात आला असून, आता तेथे केवळ भारतीय झेंडा लावण्यात आलेला आहे. पुरावा म्हणून एक फोटोदेखील दिला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

7 ऑगस्ट रोजी शेयर केलेल्या पोस्टमध्ये श्रीनगर येथील सचिवालयाच्या इमारतीचे दोन फोटो आहेत. एका फोटोत इमारतीवर भारत आणि जम्मू काश्मीरचा झेंडा आहे तर दुसऱ्या फोटोत आताचे छायाचित्र म्हणून इमारतीवर केवळ तिरंगा दिसतो. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, श्रीनगरच्या सचिवालयावरून जम्मू काश्मीरचा झेंडा हटविण्यात आला असून, तेथे आता केवळ तिरंग्याचीच शान दिसणार आहे.

तथ्य पडताळणी

विशेष दर्जाचा आधार असलेला अनुच्छेद 370 रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झाल्यानंतर गुगलवर जम्मू काश्मीरचा झेंडा काढण्यात येणार असल्याच्या अनेक बातम्या आढळल्या. नवभारत टाईम्सच्या 7 ऑगस्ट रोजीच्या बातमीनुसार, जम्मू काश्मीर राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी करण्याचा निर्णय संमत झाल्यामुळे वेगळ्या झेंड्याची आवश्यकता संपुष्टात येणार आहे. लवकरच तेथील सरकारी कार्यालयांवरून जम्मू काश्मीरचा झेंड हटविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात केवळ तिरंगाच फडकावलेला दिसेल.

मूळ बातमी येथे वाचा – नवभारत टाईम्सइंडिया टुडे 

याचा अर्थ की, अजून तसा निर्णय झालेला नाही. भविष्यात जम्मू काश्मीरचा झेंडा वापरला न जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या आणि इतर बातम्यांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, अद्याप श्रीनगरच्या नागरी सचिवालय इमारतीवर दोन्ही झेंडे लावलेले आहेत. अद्याप काश्मीरचा झेंड येथून काढलेला नाही.

ANI वृत्तसंस्थेने 7 ऑगस्ट रोजी या श्रीनगर येथील सचिवालय इमारतीवर दोन्ही झेंडे असल्याचा व्हिडियो ट्विट केला होता. यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, श्रीनगर येथील नागरी सचिवालयावर जम्मू काश्मीरच्या झेंड्यासोबत तिरंगा दिसत आहे. 5 ऑगस्ट रोजी आर्टिकल 370 रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर आता विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश झाला आहे.

अर्काइव्ह

म्हणजे श्रीनगरच्या नागरी सचिवालयावरून जम्मू काश्मीरचा झेंड अद्याप उतरविण्यात आलेला नाही.

मग हा फोटो कुठला आहे?

पोस्टमध्ये दिलेला फोटो श्रीनगर येथील नागरी सचिवालयाचा नाही. तो जम्मू शहरातील सचिवालयाचा फोटो आहे. ANI च्या वेबसाईटवर असलेला फोटो आणि त्याखाली असलेली कॅप्शन तुम्ही येथे वाचू शकता.

दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही फोटोंची तुलना केल्यवर कळते की, पोस्टमध्ये दिलेला फोटो हा एकच आहे. दुसऱ्या फोटोत एडिट करून केवळ भारताचा झेंडा दाखवण्यात आला आहे.

निष्कर्ष

एक तर पोस्टमध्ये दिलेला फोटो श्रीनगरचा नसून तो जम्मू शहरातील सचिवालयाचा फोटो आहे. दुसरे म्हणजे दोन्ही फोटो एकच असून, एडिट करून केवळ भारताच झेंडा दाखविण्यात आला. तसेच श्रीनगर येथील सचिवालयातूनही जम्मू काश्मीरचा झेंडा अद्याप काढण्यात आलेला नाही.

Avatar

Title:श्रीनगरमधील सचिवालय इमारतीवरून जम्मू काश्मीरचा झेंडा हटविण्यात आला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False