
कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. हजारो लोकांचे बळी घेतल्यानंतर इटलीमध्ये आता परिस्थिती सुधारण्याचे चिन्हे दिसू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा एक व्हिडियो शेयर करून दावा केला जात आहे की, इटलीमधील एका कोट्याधीश हॉटेल व्यवसायिकाने कोविड-19 मुळे संपूर्ण कुटुंब गमावल्यानंतर केलेल्या आत्महत्येचा हा व्हिडियो आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीमध्ये हा दावा असत्य आढळला.
काय आहे व्हिडियोमध्ये?
30 सेकंदाच्या व्हिडियो क्लिपमध्ये एक व्यक्ती उंच इमरतीवरून उडी मारून आत्महत्या करताना दिसतो. व्हिडियोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, कोरोना पीडित हॉटेल व्यावसायिकाने छतावरून उडी टाकून केली आत्महत्या. इटलीमधील अरबपती हॉटेल व्यावसायिकाचे पूर्ण कुटुंब कोरोनाचा शिकार झाले. अरबो रुपये असून पण वाचवू शकले नाहीत.
(सूचनाः सदरील व्हिडियो आत्महत्येचा असल्यामुळे तो येथे दिलेला नाही.)

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हिडियोची सत्यता तपासण्यासाठी सर्वप्रथम व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा व्हिडियो गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या माहितीसह हा व्हिडियो शेयर करण्यात आल्याचे दिसून आले. फेसबुकवर एका पेजवरून 2015 साली या क्लिपचा जास्त लांबीचा (2 मिनिटे) व्हिडियो शेयर करण्यात आला होता.
व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, रस्त्यावर चांगलीच वर्दळ आहे. रस्त्यावरील पाट्या इंग्रजी भाषेतून आहेत. पोलिसांच्या गाडीवर आपात्कालिन क्रमांक 911 दिलेला आहे.
इटलीमध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्याच्याशी हे सगळं विसंगत आहे. कारण इटलीमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे रस्त्यावर इतकी वर्दळ शक्य नाही. इटलीमध्ये पोलिसांचा इमर्जन्सी क्रमांक 112 आहे.
यावरून या व्हिडियोबाबत शंका घेण्यास मोठा वाव आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील एका कारवर 215-232-2000 असा क्रमांक दिसतो.

911 हा अमेरिकेत पोलिसांचा इमर्जन्सी क्रमांक आहे. हा सर्व विचार करून गुगलवर 215-232-2000 या क्रमांकाचा शोध घेतला. हा क्रमांक अमेरिकेतील फिलेडेल्फिया शहरातील PHL Cab नावाच्या टॅक्सी कंपनीचा निघाला. इटलीमध्ये अमेरिकेतील स्थानिक क्रमांकाची टॅक्सी धावणे शक्य नाही.
मग हा व्हिडियो नेमका कुठला आहे?
आत्महत्येचा हा व्हिडियो 2015 पासून उपलब्ध आहे, तसेच फिलेडेल्फिया शहराची टॅक्सी त्यात दिसते. हा धागा पकडून फिलेडेल्फिया शहरात 2015 च्या पूर्वी इमारतीवरून उडी मारून केलेल्या आत्महत्या प्रकरणांचा शोध घेतला.
त्यातून फिली व्हॉईस आणि ब्रेकिंग 911 वेबसाईटवरील एका बातमीतील वर्णन सदरील व्हायरल व्हिडियोशी साम्य असणारे आढळले. फिलेडेल्फिया शहराच्या सिटी सेंटर भागातील एम्बसी सुट्स हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारून एका व्यक्तीने 2 मे 2015 रोजी दुपारी तीनच्या सुमारास आत्महत्या केली होती.
एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडियोसुद्धा चित्रत केला होता व तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. फिली मॅग नावाच्या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव शॉन मॅक्ग्रेलिस (वय 37) होते.

मूळ बातमी येथे वाचा – फिली मॅग
या घटनेच्या एकाही अधिकृत बातमीत सदरील व्हिडियो दिलेला नाही. त्यामुळे हा व्हडियो शॉन मॅक्ग्रेलिस याच्या आत्महत्येचा आहे हे कसं कळणार?
त्यासाठी बातमीत उल्लेख केलेल्या फिलेडेल्फियातील एम्बसी सुट्स हॉटेलचा गुगल मॅपवर शोध घेतला. मग स्ट्रीट व्ह्युवच्या मदतीने या इमारतीच्या आसपास फिरल्यानंतर सदरील व्हिडियो ज्या जागेवरून चित्रित केला असेल ती जागा सापडली. खाली एम्बेड केलेल्या नकाशात तुम्ही ती जागा पाहू शकता.
आत्महत्येचा व्हायरल व्हिडियो आणि गुगल मॅप्समधील दृश्य यांची सांगड घातली असता सिद्ध होते की, हा व्हिडियो अमेरिकेच्या फिलेडेल्फिया शहरातीलच आहे. खाली व्हायरल व्हिडियोतील स्क्रीनशॉट आणि गुगल मॅपचे दृश्य यांची तुलना पाहू शकता. दोन्हींमधील इमारती एकच आहेत.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, आत्महत्येचा हा व्हिडियो इटलीमधीव हॉटेल व्यावसायिकाचा नाही. हा व्हिडियो अमेरिकेतील फिलेडेल्फिया शहरात 2015 साली झालेल्या आत्महत्येचा आहे. त्यामुळे या व्हिडियोचा कोरोनाशी काही संबंध नाही.

Title:इटलीमधील कोरोनाग्रस्त हॉटेल मालकाच्या आत्महत्येचा म्हणून अमेरिकेतील जूना व्हिडियो व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
