FAKE NEWS: हिजाब घालून आंदोलन करणाऱ्या पुरुषांना कर्नाटक पोलिसांनी पकडले का?

False सामाजिक

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी द्यायची की नाही यासाठी ठिकठिकाणी आंदोलने आणि प्रदर्शने सुरू आहेत. विशेषतः कर्नाटकमध्ये हिजाबच्या समर्थनात आणि विरोधात अशा दोन्ही बाजुने गट पडलेले आहेत. 

या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर लाठीचार्ज करून पोलिस धरपकड करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे, की कर्नाटकमध्ये हिजाब आंदोलनात 40 टक्के पुरुष हिजाब घालून पकडण्यात आले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की हा व्हिडिओ हिजाब आंदोलनाचा नाही आणि यात हिजाब घातलेल्या पुरुषांनासुद्धा पकडण्यात आले नव्हते.

काय आहे व्हिडिओमध्ये?

रस्त्यावर बसून आंदोलन करणाऱ्यांना पोलिस जबरदस्तीने ओढत नेत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, की “कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब आंदोलनात ४०% पुरुष सहभागी असल्याची माहिती कर्नाटक पोलीस तपासात उघड झाली आहे. हिजाब घालून आंदोलनात सहभाग झाले सापडल्यावर केली ही अवस्था.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आणि केव्हाचा आहे ते पाहुया. व्हिडिओतील कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर साहिल ऑनलाईन वेबसाईटवरील गेल्या वर्षीची बातमी आढळली. 

15 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या या बातमीत बंगुळूरमध्ये झालेल्या आंदोलनाचे विविध फोटो दिलेले आहे. कँपस फ्रंट नावाने एकत्र आलेल्या विविध विद्यार्थी संघटनांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या (NEP) विरोधात बंगळुरूमध्ये आंदोलन केले होते. कर्नाटक विधानसभेकडे मोर्चा जात असताना पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला होता.

मूळ बातमी – साहिल ऑनलाईन

हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर पोलिसांच्या या कारवाईचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या सापडल्या. मिरर नाऊ, रिपब्लिक टीव्ही, इंडिया टुडे यासह विविध वाहिन्यांनी 15 सप्टेंबर रोजी याविषयी वार्तांकन केले होते. 

केंद्राने जाहीर केलेले नवे शैक्षणिक धोरण देशाच्या विविधतेला मारक, विषमता वाढवणारे आणि विद्यार्थी हिताच्या विरोधातील असल्याचा आक्षेप घेत या विद्यार्थ्यांनी बंगुळूरुमधील रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले होते. वाहतूक कोंडी होऊ लागल्यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्यांना हटविण्यासाठी लाठीचार्ज केला व काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतले होते.

या आंदोलनामध्ये हिजाब घातलेले पुरुष पकडल्याची कोणताही उल्लेख बातम्यांमध्ये नाही किंवा तशी घडल्याचीही बातमी नाही. शिवाय आंदोलनाच्या विविध व्हिडिओमध्येसुद्धा तसे काही दिसत नाही. या आंदोलनाचे विविध व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

व्हायरल व्हिडिओ आणि बंगळुरू येथील विद्यार्थी आंदोलनातील दृश्याची तुलना केल्यावर कळते की, दोन्ही व्हिडिओ एकच आहेत. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते, की जुना व्हिडिओ हिजाब विवादाशी जोडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. गेल्या वर्षी नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा व्हिडिओ हिजाब घालून आंदोलन करणाऱ्या पुरुषांना पोलिसांनी पकडले, अशा खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FAKE NEWS: हिजाब घालून आंदोलन करणाऱ्या पुरुषांना कर्नाटक पोलिसांनी पकडले का?

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False