
“सांगली” व “कोल्हापूर” पूर स्तिथी निवारणासाठी साहेबांनी बोलावली बैठक. सगळे पर्याय संपतात त्यावेळी माणूस देवाकडे साकडे घालतो त्याच प्रमाणे सर्व भा.ज.प वाल्यांनी आपले दैवत शरद पवार साहेबांकडे सांगली आणि कोल्हापूर मधील पूर स्तिथी निवारन्यासाठी मदतीचे साकडे घातले. साहेबांनी 4 दीवसापुर्वीच सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकार्यांना अटी-तटीच्या मदतीची सुचना देऊन ठेवली हेती. #सत्ता_असो_नसो_सर्व_प्रश्नांच_उत्तर_एकच_साहेब (आज दु.३:४५ वा. रयत भवन मार्केट कमिटी, बारामती येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीची मिटिंग सुरु आहे ?) अशी माहिती राष्ट्रवादी पुन्हा या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टसोबत एक फोटोही देण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा फोटो याच बैठकीचा आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरपरिस्थिती गंभीर असताना राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांना भाजप नेत्यांनी साकडे घातले आहे का? याचा शोध घेण्यासाठी आम्ही गुगलवर भाजपवाल्यांचे शरद पवारांना साकडे असा शब्दप्रयोग केला. त्यावेळी आम्हाला अशी कोणतीही घटना घडला असल्याचे वृत्त दिसून आले नाही. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की? या बैठकीचे म्हणून जे छायाचित्र दाखविण्यात येत आहे, ते नेमके कुठले आणि कधीचे आहे. आम्ही हे रिव्हर्स इमेज सर्च करुन पाहिले. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.
या परिणामात आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP.ORG या संकेतस्थळावर 27 जून 2017 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. यात शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या व्हेरिफाईड ट्विटर खात्यावर 22 जून 2017 रोजी हा फोटो ट्विट केला आहे. या छायाचित्रावरील ओळीत शेतकऱ्यांची कर्जमाफी व हमीभाव अशा कृषिविषयक विविध प्रश्नांबाबत @CMOMaharashtra , व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करताना, असे म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांनीही त्यांच्या व्हेरिफाईड ट्विटर खात्यावर 22 जून 2017 रोजी ट्विट करत म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आज आदरणीय @PawarSpeaks व @CMOMaharashtra , यांच्यात दिल्ली मध्ये झालेल्या बैठकीस उपस्थित राहिलो @NCPspeaks
एनएमटीव्हीने 24 जून 2017 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तात मात्र बैठकीचे छायाचित्र वापरलेले नाही. फक्त भेट घेतल्याचे या वृत्तातुन स्पष्ट होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे बारामतीमधील संस्था, मंडळे, संघटनांच्या बैठकीत नागरिक व प्रतिनिधींनी अवघ्या एक तासात सुमारे १ कोटी रुपयांची वर्गणी सातारा, सांगली, कोल्हापूर व अन्य भागातील पूरग्रस्त पीडितांना मदत म्हणून दिली, असे सांगत पवारांनी या बैठकीचा फोटो दिला आहे. तो आपण खाली पाहू शकता.कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे
कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे बारामतीमधील संस्था, मंडळे, संघटनांच्या बैठकीत माझ्या काही तासांपूर्वीच्या हाकेला प्रतिसाद देत नागरिक व प्रतिनिधींनी अवघ्या एक तासात सुमारे १ कोटी रुपयांची वर्गणी सातारा, सांगली, कोल्हापूर व अन्य भागातील पूरग्रस्त पीडितांना मदत म्हणून दिली. pic.twitter.com/otC8jZlZlX
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 9, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला असता त्यांनी आपण महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडे आपण सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली होती. मात्र त्यांनी अशी भेट अथवा बैठक त्यांनी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.
निष्कर्ष
शरद पवारांनी बारामतीमधील संस्था, मंडळे, संघटनांची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी पुरग्रस्तांसाठी मदत निधी जमा केला. याचे छायाचित्र त्यांनी त्यांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिध्द केले आहे. ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांचे मार्गदर्शन अनेक नेते घेत असतात मात्र भाजप नेत्यांनी सांगली, कोल्हापूरमधील पुरपरिस्थिती निवारण्यासाठी शरद पवारांना मदतीचे साकडे घातल्याचा म्हणून जो फोटो व्हायरल करण्यात येत आहे तो जुना म्हणजेच जून 2017 मधील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा पोस्टमधील दावा असत्य सिध्द होत आहे.

Title:Fact Check : हा फोटो शरद पवारांनी पुरपरिस्थितीबाबत घेतलेल्या बैठकीचा आहे का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
