सचिन तेंडुलकरने सिंधुताई सपकाळ यांना खांदा दिला नाही; हा फोटो जुना आहे

False सामाजिक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (74) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी (चार जानेवारी) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (पाच जानेवारी) ठोसरपागा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे अनेक फोटो, व्हिडिओ आणि स्टेटस/स्टोरी शेअर केल्या गेल्या. यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचादेखील एक फोटो व्हायरल झाला. सचिनने सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्ययात्रेत त्यांना खांदा दिला, असा या फोटोसह दावा केला जात आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले, की सचिनचा हा फोटो तीन वर्षे जुना आहे. त्याने सिंधुताई सपकाळ यांना खांदा दिल्याचा दावा असत्य आहे.

काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

सचिन तेंडुलकरचा पार्थिवाला खांदा देतानाचा फोटो शेअर करून म्हटले, की “आज एक गोष्ट समजली, पुरस्कार महत्त्वाचा नसून कर्तृत्व महत्त्वाचं असतं. कारण आज एका पद्मश्रीला भारतरत्नाने खांदा दिला. भावपूर्ण श्रद्धांजली माई.”

मूळ पोस्ट – फेसबुकफेसुबक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले, की हा फोटो तीन वर्षे जुना आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या 3 जानेवारी 2019 रोजीच्या बातमीत हा फोटो वापरण्यात आलेला आहे. त्यानुसार, सचिनचे शाळेतील क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या अंत्ययात्रेतील हा फोटो आहे. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेत सचिनने त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता.

मूळ बातमी – इंडियन एक्सप्रेस

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सिंधुताई सपकाळ यांच्यावर बुधवारी ठोसर पागा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी शासनातर्फे सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सचिनचा तीन वर्षे जुना फोटो चुकीच्या माहितीसह व्हायरल होत आहे. सचिनने त्यांचे बालपणीचे क्रिकेट कोच रमाकांत आचरेकरांना खांदा दिल्यावेळीचा हा फोटो आहे. त्यामुळे सिंधुताई सपकाळ यांना त्याने खांदा दिली, हा दावा असत्य आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:सचिन तेंडुलकरने सिंधुताई सपकाळ यांना खांदा दिला नाही; हा फोटो जुना आहे

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False