कोरोनाला रोखण्यासाठी सांगितलेले हे उपाय कितपत योग्य आहेत? वाचा सत्य

Coronavirus False Medical

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल मीडियावर विविध उपाय सुचविले जात आहेत. यातील अनेक गोष्टी चुकीच्या आहेत किंवा त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. अशाच पार्श्वभूमीवर एका मराठी दैनिकाने कोरोनाला रोखण्यासाठी काही प्रतिबंध उपाय सुचविले आहेत. मीठाच्या कोमट पाण्यात गुळण्या करण्यापासून ते 26 डिग्री तापमानात हा विषाणू तग धरू शकत नसल्याचे दावे यामध्ये करण्यात आले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याची पडताळणी करण्याची व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) विनंती केल्यानंतर तपासणी केली असता यातील अनेक दावे चुकीचे आणि निराधार असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

या पोस्ट खाली अनेकांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. 

तथ्य पडताळणी

पोस्टमधील दाव्यांचे अध्ययन केल्यावर लक्षात आले की, काही दिवसांपूर्वी ‘युनिसेफ’च्या (UNICEF)  नावे एक खोटा मेसेज व्हायरल झाला होता. त्यामध्ये वरील पोस्टप्रमाणे दावे करण्यात आले होते. तो खोटा (FAKE) मेसेज तुम्ही मराठी आणि इंग्रजी, इंग्रजी भाषेत वाचू शकता. यामध्ये प्रामुख्याने खाली दिल्याप्रमाणे दावे करण्यात आले होते.

1. आईस्क्रीम आणि कोल्ड फूडपासून दूर रहाणे महत्वाचे आहे.

2. कोमट पाण्याने आणि मीठाने उकळणे टॉन्सिल्सचा नाश करते आणि त्यांना फुफ्फुसात गळती होण्यापासून प्रतिबंध करते.

3. कोरोना विषाणूचा आकार 400-500 मायक्रोच्या सेल व्यासासह आकारात मोठा असतो, म्हणून कोणताही मास्क त्याच्या प्रवेशास प्रतिबंधित करतो .

4. हा विषाणू 10 मिनिटांपर्यंत हातावर जगतो म्हणून अल्कोहोल सेनिटायझरला खिशात घालणे प्रतिबंधनाच्या उद्देशाने पुरेसे आहे.

5. जर विषाणूला 26-27 डिग्री सेल्सियस तपमानाचा असेल तर तो ठार होईल, परंतु तो गरम भागात राहत नाही. तसेच गरम पाणी पिणे आणि उन्हात जाणे पुरेसे चांगले आहे.

‘युनिसेफ’चे उपकार्यकारी संचालक (पार्टनरशिप) यांनी 6 मार्च 2019 रोजी हा मेसेज खोटा असल्याचे एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. ‘युनिसेफ’च्या वेबसाईटवर हे पत्रक उपलब्ध आहे. त्यांनी म्हटले की, कोरोना रोखण्याचे उपाय म्हणून ‘युनिसेफ’च्या नावे फिरवला जाणारा तो मेसेज खोटा आहे. ‘युनिसेफ’ने असा कोणताही संदेश प्रसारित केलेला नाही. ‘युनिसेफ’ सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या नावे असे खोटे मेसेज पसरविणे थांबवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

मूळ पत्रक येथे वाचा – युनिसेफ

म्हणजे युनिसेफच्या नावे केल्या जाणाऱ्या व्हायरल मेसेजमधील दावेच ‘लोकमत’ने कोरोना प्रतिबंध उपाय म्हणून शेयर केले आहेत. आता यातील प्रत्येक दाव्याची पडताळणी करूया.

दावा क्र 1. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

तथ्य: बरोबर

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करणे टाळावे. साथीच्या काळात शक्य तितका वावर मर्यादित असावा. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा गर्दी न करण्याचा (Social Distancing) सल्ला दिला आहे.

दावा क्र 2. थंड पदार्थ खाणे टाळावे

तथ्य:  चूक

युनिसेफने खोट्या व्हायरल मेसेजसंबंधी जो खुलासा प्रसिद्ध केला होता, त्यातदेखील आईसक्रीमसारखे थंड पदार्थ खाणे टाळल्याने कोरोनाचा धोका टळतो असे म्हणने चुकीचे असल्याचे म्हटले होते. 

केंद्रीय पत्रसूचना विभागानेदेखील (PIB) आईस्क्रीम व तत्सम थंड पदार्थ खाल्ल्यामुळे कोरोना होत नाही असे म्हटले आहे. थंड खाद्यपदार्थ आणि कोरोना यांचा संबंध असल्याचे अद्याप झालेल्या संशोधनातून समोर आलेला नाही.

दावा क्र 3. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारले जातात

तथ्य: चूक

सर्दी, ताप, खोकला किंवा घसा बसल्यावर मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या जातात. परंतु, कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून हा उपाय काही कामाचा नाही. जॉन हॉपकिन्स मेडिसिन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिठाच्या पाण्याने गुळणा केल्याने कोरोनाची लागण थांबवता येत नाही. जागितक आरोग्य संघटनेनेसुद्धा मीठाच्या पाण्याने नाक साफ करमे प्रतिबंधित उपाय ठरून शकत नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होतो, हा दावा देखील असत्य असल्याचे याठिकाणी म्हटले आहे.

मूळ वेबसाईट येथे पाहा – Johns Hopkins MedicineWHO Myth Buster

दावा क्र 4. कोरोनाचा आकार मोठा असल्याने साध्या मास्कमुळे संरक्षण होऊ शकते.

तथ्यः अर्धसत्य

कोविड-19 या आजारासाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूचा आकार केवढा याविषयी संशोधन सुरू आहे. त्यामुळे आकाराची तुलना शक्य नाही. तरी चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या प्राथमिक संशोधनानुसार, कोरोना विषाणूची (SARS-CoV-2) आकार 60 ते 140 नॅनोमीटर असल्याचे आढळले. कोरोना व्हायरस ही विषाणूंचा एक गट आहे. या गटातील आणि सार्स या रोगाला कारणीभूत असणारा विषाणू (SARS-CoV) 100 ते 125 नॅनो मीटर असतो. म्हणजे दोन्ही विषाणू सारख्याच आकारचे असण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सर्दी-खोकला असणाऱ्या लोकांनी मास्क लावण्याची खरी गरज आहे. फक्त मेडिकल मास्क लावल्याने कोरोनाचा धोका टळत नाही. त्यासाठी वारंवार अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर किंवा साबणाने स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे. अधिक सविस्तर येथे वाचा – मास्क केव्हा वापरावा?

दावा क्र 5. विषाणू हातावर 10 मिनिटे जगतो

तथ्यः चूक

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या संशोधनानुसार, कोरोना व्हायरस पृष्ठभागावर 24 तासांपेक्षा जास्त काळ सक्रीय राहू शकतो. हवेतील तुषारांमध्ये 3 तास, लाकडी पृष्ठावर 24 तास आणि प्लॅस्टिक व स्टेनलेस स्टीलवरती 2-3 दिवसांपर्यंत हा कोरोनाचा विषाणू तग धरू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवरदेखील ही माहिती आहे. त्यामुळे वारंवार हात धुणे आणि घरातील वस्तूदेखील जंतुनाशकाने साफ करणे एवढी काळजी घ्यावी. 

मूळ संशोधन येथे वाचा – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ

दावा क्र 6: 26 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगत नाही

तथ्यः चूक

इतर विषाणू एका निश्चित तापमानमर्यादेपलिकडे निष्क्रिय होत असतात. परंतु, कोरोना व्हायरसविषयी असे कोणतेही प्रमाण सापडलेले नाही. 26 डिग्री तापमानावर हा विषाणू तग धरू शकत नाही, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. उलट जागितक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, उष्ण आणि दमट भागातदेखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवतो. वातावरण कसेही असले तरी, या विषाणूची लागण होऊ शकते. 

मूळ बातमी येथे वाचा – WHO Myth Buster

जागतिक आरोग संघटनेचे कार्यकारी संचालक माई रायन यांनी सर्व देशांना इशारा दिला होता की, उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग कमी होईल असे मानू नका. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. 

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनीदेखील वाढीव तापमानात कोरोना जगणार नाही या दाव्याला खंडित केले आहे. त्यांनी सांगितले की, तापमान वाढल्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होईल असे म्हणता येणार नाही. विभिन्न तापमानाच्या प्रदेशात याचा प्रादुर्भाव आढळत आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, सदरील मराठी दैनिकाने प्रसिद्ध केलेले कोरोना प्रतिबंध उपाय चुकीचे आणि असत्यापित आहेत.

Avatar

Title:कोरोनाला रोखण्यासाठी सांगितलेले हे उपाय कितपत योग्य आहेत? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False